Vivek Phansalkar & Akola. Sarkarnama
विदर्भ

Akola : पोलिस महासंचालक विवेक फणसळकर आणि अकोल्याचे नाते...

DGP Maharashtra : जिल्ह्यात गाजविला होता कालावधी; विदर्भातही दिली सेवा

प्रसन्न जकाते

Vivek Phansalkar : महाराष्ट्रात आपल्या कामाने डंका गाजवणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांची राज्याच्या प्रभारी पोलिस महासंचालकपदी 2023 वर्षाच्या अखेरच्या दिवशी नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी (ता. 31) यासंदर्भातील आदेश गृह विभागाकडून निर्गमित करण्यात आलेत.

विवेक फणसळकर आणि विदर्भातील अकोला शहराचे बरेच जुने नाते आहे. 1989 मधील तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले फणसाळकर महाराष्ट्र पोलिस दलात उपअधीक्षक म्हणून रुजू झाले ते सर्वप्रथम अकोला या अत्यंत संवेदनशील शहरात. फणसाळकर यांना अकोला शहर विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती मिळाली. प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांनी अकोला शहराचे उपअधीक्षक पदाची पूर्णवेळ अधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतली.

नव्वदच्या दशकातील दंगलींमध्ये संपूर्ण देशभर होरपळून निघाला होता. अशात अत्यंत संवेदनशील असलेल्या अकोला शहरालाही या आगीच्या भडक्याची मोठी झळ बसली होती. दंगल, जाळपोळ आणि गोळीबाराच्या धक्क्यातून अकोला शहर सावरलेले नव्हते. मोर्णा नदीच्या अलीकडील जुने शहर व पलीकडील नवीन शहर दहशतीत होते. अशातच विवेक फणसळकर नावाचा नवीन तरुण चेहरा अकोला शहरात दाखल झाला. पूर्णवेळ अधिकारी म्हणून नियुक्ती मिळतात फणसाळकर यांनी आपल्या कार्यकाळात गुन्हेगार व समाजकंटकांवर अल्पावधीत वचक तर मिळवलाच याशिवाय दगलींची धास्ती मनात खोलवर बसलेल्या व अनेक रात्र जागून काढणाऱ्या सामान्यांना या भीतीच्या काळोखातून बाहेर निघण्यासाठी त्यांनी मोलाची मदतही केली.

अकोला शहरातील पोलिस उपअधीक्षक कार्यालयात त्यावेळी शहर कोतवाली पोलिस ठाण्याच्या वरील माळ्यावर होते. या कार्यालयाच्या समोरच एक गॅलरी देखील आहे. या गॅलरीतून विवेक फणसाळकर अनेक बंदोबस्तांवर व शहरातील हालचालींवर लक्ष ठेवायचे. त्यावेळी अकोला शहरात मोजकीच पोलिस ठाणी होती. अकोला आणि वाशिम जिल्ह्याचे विभाजनही तेव्हा झालेले नव्हते. अकोला शहर आणि संवेदनशीलता हे शब्द अनेक वर्षांपर्यंत एकच होते. अत्यंत संवेदनशील व जातीय दंगलींसाठी प्रसिद्ध असल्याने अकोला शहरात नियुक्ती घेण्यासाठी पोलिस व महसूल विभागातील अधिकारी आजही इच्छुक नसतात. अशात नव्वदच्या दशकातील काळाचा विचार केल्यास तेव्हाची ‘पॉलिसिंग’, तंत्रज्ञान, वाहनांची परिस्थिती, जुनाट बिनतारी संदेश यंत्रणा (Low Band Wireless), थ्री नॉट थ्रीच्या बंदुका काय असेल, याची एकूणच कल्पना करता येईल. शिवजयंतीची , गणपती विसर्जन, होळी, धुलिवंदन, पोळा, ईद असे उत्सव त्या काळात पोलिसांसाठी तणावपूर्ण ठरायचे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विविध व्याख्याने, जाहीर सभा, प्रार्थनेचे कार्यक्रम यातून या तणावात प्रसंगी भर पडायची. अकोल्यात त्यावेळी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांचे प्रचंड वर्चस्व होते. काही माफियांनी देखील डोके वर काढायला नुकतीच सुरुवात केली होती. अशा सर्व परिस्थितीत विवेक फणसाळकर यांनी लोकांमध्ये जाऊन परिस्थितीवर मात केली. त्यामुळे अत्यंत संवेदनशील आणि अधिकाऱ्यांना नकोसे झालेल्या अकोल्याची प्रतिमा बरीच दुरूस्त झाली. अकोल्यातील फणसाळकर यांचा कार्यकाळ कमी रजा घेणारा अधिकारी असाच होता. अकोल्यातील आपल्या कार्यकाळानंतर फणसाळकर यांनी पोलिस दलात जी आगेकूच केली ती आजपर्यंत कायम आहे.

तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांचे एडीसी, वर्धा, परभणीचे पोलिस अधीक्षक, नाशिकचे डीसीपी, सीआयडी नागपूरचे पोलिस अधीक्षक, कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाचे व्हिजिलन्स डायरेक्टर, मुंबईचे सहपोलिस आयुक्त वाहतूक तथा प्रशासन, मुंबई एटीएएस प्रमुख, ठाण्याचे पोलिस आयुक्त असा त्यांचा कार्यकाळ राहिला आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त असताना कन्या मैत्रयीचा विवाह सोहळा सोडून डिसेंबर 2022 मध्ये फणसाळकर महाविकास आघाडीच्या महामोर्चामुळे ड्यूटीवर तैनात होते. त्यामुळे ते बरेच चर्चेत आलेत.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT