Protest of Dhangar Community in Amravati. Sarkarnama
विदर्भ

Dhangar Reservation : प्रजासत्ताकदिनानंतर आरक्षणासाठी होणार तीव्र आंदोलन

Amar Ghatare

Amravati : धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने शिंदे समिती नेमली आहे. समिती स्थापन होऊन एक महिना लोटला असला तरी अद्याप शिंदे समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केलेला नाही. हा अहवाल तत्काळ राज्य सरकारने समितीला मागावा, अशी मागणी धनगर समाजाकडून करण्यात आली आहे.

सरकारकडे या मागणीसाठी धनगर परिषद विदर्भ प्रदेश व अमरावती जिल्ह्यातील धनगरबांधवांनी अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. या निवेदनातून सरकारला 26 जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

राज्य सरकारने धनगर आरक्षणाचा विषय निकाली काढण्याचे ठरविले होते. मात्र यासंदर्भात आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. शिंदे समिती काही राज्यांचा अभ्यास करणार होती, हा अभ्यास झाला का की अद्याप अभ्यासाला सुरुवातच झाली नाही, असा सवाल करण्यात आला. याबाबत सरकारने मौन धरले आहे.

धनगर समाजाच्या आजवर झालेल्या आंदोलनांची व नागपूर अधिवेशनावर धनगर समाजाने काढलेल्या विराट मोर्चाचीही सरकारने दखल घेतलेली नाही. मोर्चानंतर सरकारने धनगर समाजाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यात अधिवेशनावर मोर्चा काढणाऱ्या विदर्भातील एकाही नेत्याचा समावेश नव्हता. सरकारधार्जिण्या नेत्यांनाच बैठकीचे निमंत्रण देऊन आरक्षणाच्या विषयाची विल्हेवाट लावण्यात आल्याचा आरोप होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विषयाला संपूर्णपणे बगल देण्यात आली. आरक्षणाचा विषयसुद्धा बैठकीत घेण्यात आलेला नाही. याचाच अर्थ सरकार धनगर आरक्षणाबाबत गंभीर नाही, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. 26 जानेवारीपर्यंत शासनाने धनगर परिषद विदर्भ प्रदेशाच्या धनगर समाज प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावून आरक्षणाबाबत ठोस कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

धनगर आरक्षणाचा मुद्दा

धनगर समाजाला अनुसूचित जमाती संवगार्तून (ST) आरक्षण द्यावं, अशी या समाजाची जुनी मागणी आहे. सध्या धनगर समाजाला भटक्या-विमुक्त संवर्गातून (NT) आरक्षण आहे. अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे एकच असून इंग्रजीमध्ये R ऐवजी D असा शब्द वापरण्यात आला आहे. 'ड' ऐवजी 'र' असा उल्लेख आल्याने आतापर्यंत समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये झाला नसल्याचा दावा धनगर समाजातर्फे करण्यात येतो. धनगर किंवा धनगड यापैकी कोणताही उच्चार असला तरी त्याचा अर्थ समान असल्याचा दावा समाजातर्फे करण्यात आला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या राज्यभरात धनगर समाजाचे आरक्षण सुरू आहे. यावरून आता राज्यभरात आंदोलन तीव्र होत चालले आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT