MP Balu Dhanorkar, MLA Pratibha Dhanorkar and Others
MP Balu Dhanorkar, MLA Pratibha Dhanorkar and Others Sarkarnama
विदर्भ

Dhanorkar : धानोरकर दाम्पत्याची दिवाळी तृतीयपंथीयांसोबत, घराचे स्वप्न पूर्ण करणार...

Atul Mehere

नागपूर : दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर लक्ष्मीची कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते. साधारणतः याच पद्धतीने दिवाळी (Diwali) साजरी केली जाते. चंद्रपूरचे (Chandrapur) खासदार बाळू धानोरकर आणि त्यांच्या पत्नी वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर (MLA Pratibha Dhaonrkar) यांनी तृतीयपंथीयांचे शुभ आशीर्वाद घेत या समुदायासोबत दिवाळी साजरी केली.

तृतीयपंथीयांना घर देण्याची घोषणा मागील वर्षी दिवाळीत खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी केली होती. त्यांच्या घरांचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आहे. काही महिन्यांतच तृतीयपंथी बांधवांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मांगल्यपूर्ण दीपोत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करीत मिठाईसोबत आनंदाची देवाणघेवाण होते. धानोरकर दाम्पत्य तृतीयपंथीयांसोबत हा आनंद दरवर्षी साजरा करतात.

मागील दोन वर्षांत कोरोनाचे भीषण संकट होते. लॉकडाऊनमुळे असंघटित आणि अल्पसंख्याक असलेला तृतीयपंथी वर्ग चांगलाच भरडला गेला. त्यांना उदरनिर्वाहासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. अशा स्थितीत दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी तृतीयपंथी समुदायाला घरी निमंत्रित केले होते. आपल्याला निखळ आनंद देणारी दिवाळी साजरी करण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी या समुदायातील लोकांच्या चेह-यावर स्नेह, प्रेम आणि आनंद झळकत होता.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव विनोद दत्तात्रय, काँग्रेस महिला ग्रामीण अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, एनएसयूआय अध्यक्ष यश दत्तात्रय, काँग्रेस युवा नेते राज यादव, पप्पू सिद्धीकी, तृतीयपंथी बांधवांमध्ये साजन, बिंदिया नायक, बिपाशा, स्वीटी, पिंकी, करीना, राखी यांची उपस्थिती होती. यावेळी धानोरकर दाम्पत्याने तृतीयपंथी लोकांशी संवाद साधला. त्यांची आस्थेने विचारपूस करीत त्यांच्या समस्या, समाजाकडून अपेक्षा काय आहेत हेसुद्धा जाणून घेतले. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण राष्ट्रीय पातळीवर हा आवाज उचलणार, असे आश्वासन खासदार बाळू धानोरकर यांनी दिले.

आमदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांच्या समस्यांच्या आवाज विधानसभेत मांडला होता. पोलीस भरतीत त्यांना २ टक्के आरक्षण देण्याची मागणी केली होती. ती मागणी पुढे लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे बाळू धानोरकर हे लोकसभेच्या निवडणुकीला उभे असताना त्यांच्या प्रचाराची धुरा तृतीयपंथी लोकांनी सांभाळली होती. तेव्हापासूनच धानोरकर या समाजाशी सातत्याने जुळून आहेत. याची फलश्रुती म्हणून त्यांनी दिवाळीला तृतीयपंथी लोकांना बोलावून ते देखील आपल्या कुटुंबाचा भाग आहे, असा संदेश दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT