Eknath Shinde, Shivsena
Eknath Shinde, Shivsena Sarkarnama
विदर्भ

उपमुख्यमंत्रीपदाच्या ऑफरनंतर एकनाथ शिंदे सुरतमध्ये दाखल !

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या ११ समर्थक आमदारांना सोबत घेऊन गुजरातेतील सुरत गाठले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. तेथे एका हॉटेलात सर्वांची बडदास्त ठेवण्यात आली आहे. सुरुवातीला ११ आमदार सोबत असल्याचे सांगण्यात येत होते. पण गेल्या तीन तासांत झालेल्या घडामोडींमध्ये ही संख्या आता २२ वर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.

विधानपरिषद निवडणुकीत ज्या ११ मतांना भाजपने सुरुंग लावला होता, सुरुवातीला जे ११ आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत होते, ते हेच असल्याची माहिती आहे. यामागे भाजपचीच (BJP) खेळी असल्याचा आरोप शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना केला. एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार ज्या हॉटेलात आहेत, त्या हॉटेलला घेराबंदी करण्यात आल्याचीही माहिती आहे. हॉटेलकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

मध्यप्रदेश पॅटर्न महाराष्ट्रात राबविण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसेना नेते करीत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान महाराष्ट्रातील ऑपरेशन लोटसचे जनक राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. एव्हाना ते दिल्लीत दाखल झाल्याचेही सूत्र सांगतात. त्यामुळे येथून पुढे वेगवान घडामोडी होण्याची चिन्हे दिसत आहेत. आधी राज्यसभा निवडणूक, त्यानंतर विधानपरिषद निवडणूक पार पडली. या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली.

शिवसेनेत नाराज असलेले महत्वाचे बडे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना गुजरातेत ठेवून शिंदेंना याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याचीही माहिती आहे. शिवसेनेचा मोठा गट फोडून एकनाथ शिंदे हे प्रतिशिवसेना स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असे गणित जुळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती आहे. देवेंद्र फडणवीस आता दिल्लीत पोहोचले आहेत. पुढील १ ते २ तासांत वेगवान घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड कोणते वळण घेते, हे बघणे औत्सुक्याचे राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT