मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) बडे नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मानणारे स्वपक्षातील आमदार आता आपल्या मनातील खदखद बाहेर काढत आहेत. पक्षातील नव्या नेतृत्वाच्या 'स्टाईलवर' आक्षेप घेवून त्यांनी आपल्याच पक्षात वादाची ठिणगी पेटवली. या ठिणगीचा वणवा आता मातोश्री ते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पेटण्याची शक्यता आहे. शिंदे समर्थकांनी आपला रोख युवासेनेचे नेते, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या दिशेने ठेवल्याचे मानले जात आहे.
ऐन विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावरच शिंदे समर्थक आमदारांनी उघडपणे नाराजी मांडत आहेत, याचा परिणाम शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. या धुसफुशीचा फायदा घेण्यावर भाजपने आधीच डोळा ठेवला आहे. त्यात आता शिंदे समर्थक आमदारांच्या नाराजीची भर पडली आहे. मात्र पक्षात कुठचेही मतभेद नाहीत. सगळी मंडळी एकत्र येऊन काम करत आहोत. विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी झटत आहोत, असे सांगून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षात काडीचेही मतभेद नसल्याचे, 'वेस्टलीन'... (रेनिन्सस) या हॉटेलमध्येच जाहीर केले.
शिवसेनेमध्ये शिंदे समर्थक आमदारांची संख्या किमान दीड ते दोन डझन आहे. हे आमदार शिंदे यांच्या शब्दापलीकडे जात नाहीत. अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जरी काम असले; तरीही हे आमदार आधी शिंदे यांनाच भेटतात. शिंदे सोडून हे आमदार शिवसेनेच्या एकाही मंत्र्यांना हे आमदार जुमानत नाहीत. अर्थात, कितीही महत्वाची कामे असली तरीही शिंदे यांच्याशिवाय हे आमदार इतरांच्या खात्यामध्ये फिरकतही नाहीत. शिंदे यांच्याशी स्पर्धा असलेल्या किंवा त्यांच्या विरोधी गटातील मंत्री, आमदारांशी शिंदे समर्थक आमदार फटकून वागतात. त्यातच राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्त ठाकरे यांच्यापासून सारेच मंत्री पक्षाच्या आमदारांशी जवळीक साधून आहेत.
पण अपक्ष आमदारांसारखेच शिंदे समर्थक आमदारांमध्ये नेतृत्वाबाबत प्रचंड नाराजी आहे. गेली अडीच वर्ष आम्हाला फारशी किंमत दिली जात नव्हती. आता मात्र आम्हाला नव-नवे आदेश देऊन, आमच्यावर अविश्वास दाखविला जात आहे, अशी भावना शिंदे समर्थक आमदारांची खाजगीत मांडत आहेत. ती शनिवारच्या बैठकीत पुन्हा एकदा उघड झाली. त्यामुळे शिवसेनेचे नेतृत्व आणि शिंदे समर्थक आमदारांमध्ये दरी वाढण्याची भीती आहे. त्यात आमदारांच्या बैठकीत काही बाबींवर आक्षेप घेत शिंदे यांच्याकडे तक्रार केली आणि त्यातून मतभेद असल्याचे पुढे आले. एकीकडे भाजपकडून फोडाफोडीची शक्यता असतानाच शिंदे समर्थक आमदारांनी नेतृ्त्वाच्या दिशेने बोट दाखविल्याने शिवसेना नेत्यांची अक्षरशः झोपच उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.