Sanjay Gaikwad FIR Sarkarnama
विदर्भ

Sanjay Gaikwad FIR : संजय गायकवाडांविरोधात गुन्हा; श्वेता महालेंचा थेट निशाणा, बुलढाण्यात महायुतीत पुन्हा संघर्ष

Sanjay Gaikwad booked over controversial remark; Shweta Mahale hits back : महिलेच्या तक्रारीवरून BNS कलम 79 अंतर्गत गुन्हा दाखल; वादग्रस्त वक्तव्यावरून श्वेता महालेंनी गायकवाडांना सुनावले

Pradeep Pendhare

Sanjay Gaikwad Controversial Statement : बुलढाणा जिल्ह्यातील भाजप आणि शिंदेसेनेतील राजकीय संघर्ष आता थेट पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. भाजप आमदार श्वेता महाले आणि एकनाथ शिंदे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

एका 42 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 79 अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा शहरात त्यांच्या मित्रपरिवाराकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘बाप तो बाप रहेगा’ हे गाणे मोठ्या आवाजात वाजवण्यात आले. या कार्यक्रमावर प्रतिक्रिया देताना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झाला आहे.

गायकवाड यांनी ‘बाप तो बाप है’ हे विधान पुरुषाने केले तर ठीक आहे, मात्र एखाद्या महिलेने ‘बाप तो बाप आहे’ असे म्हटल्यास ‘बापाचं शरीर आणणार कुठून?’ असा सवाल केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. या वक्तव्यामुळे महिलांच्या सन्मानाला आणि लज्जेला धक्का पोहोचल्याचा आरोप करत एका महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीची दखल घेत बुलढाणा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 79 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

श्वेता महालेंचा गायकवाडांवर निशाणा

या प्रकरणावर भाजप आमदार श्वेता महाले यांनी प्रतिक्रिया देताना गायकवाडांवर थेट निशाणा साधला. ‘महिलांच्या शरीरावर बोलणे हा गुन्हा आहे. तुम्ही आमदार असलात तरी संविधानाने तुम्हाला असे बोलण्याचा अधिकार दिलेला नाही,’ असे महाले यांनी म्हटले. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांची याबाबतची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

वाढदिवस कोणाला चॅलेंज करण्यासाठी नव्हता

विद्याधर महाले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवरही श्वेता महाले यांनी भाष्य केले. वाढदिवसाच्या कार्यक्रमात महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. मित्रपरिवार आणि नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. ही गर्दी कोणाला आव्हान देण्यासाठी नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.

80 हजार मतांवरून 500 ते 800 मतांवर आलात’

‘कोण आहे बाप? माझ्यासाठी जनता-जनार्दन ही मायबाप आहे,’ असे म्हणत महाले यांनी गायकवाडांना प्रत्युत्तर दिले. ‘बुलढाणेकरांनी कोणत्याही दडपशाहीला बळी पडू नये. कोणाचा कार्यक्रम करायचा हे जनता ठरवते,’ असेही महाले म्हणाल्या. याचवेळी त्यांनी गायकवाडांचे नाव न घेता, ‘80 हजार मतांवरून 500 ते 800 मतांवर आला आहात, याचा विचार करा,’ असा टोला लगावला.

महायुतीतील संघर्ष पुन्हा ऐरणीवर

बुलढाण्यातील या प्रकरणामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांच्यातील स्थानिक राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. दोन्ही पक्ष राज्यात सत्तेत असले तरी बुलढाण्यातील स्थानिक राजकारणात त्यांच्यातील मतभेद वारंवार समोर येत आहेत. आता वादग्रस्त वक्तव्यावरून गुन्हा दाखल झाल्याने हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT