Mahavikas Aghadi Sarkarnama
विदर्भ

Shiv Sena Thackeray Party : हिंगण्यावर दावा शिवसेना ठाकरे पक्षाचा, अडचण राष्ट्रवादी पवार पक्षाची...

Rajesh Charpe

Nagpur News : महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाने नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि हिंगणा या दोन विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. रामटेकमध्ये अडचण नसली, तरी हिंगण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची समजूत घालावी लागणार आहे. त्या बदल्यात शहरातील पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ देऊन हा पेच निकाली काढण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) आघाडी असताना काटोल आणि हिंगणा हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होते. भाजप-शिवसेना युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला रामटेक आणि काटोल हे दोन मतदारसंघ होते. आता महाआघाडीमुळे कोणी कोठूण लढायचे ही नवी समस्या निर्माण झाली आहे. काटोलमध्ये सातत्याने राष्ट्रवादीचे अनिल देशमुख निवडून येत आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनाला आता सोडावा लागणार आहे. त्या बदल्यात त्यांनी हिंगणा मतदारसंघ मागितला आहे.

हिंगण्यामधून रमेश बंग यापूर्वी एकदा निवडून आले होते. आघाडी सरकारच्या सरकारमध्ये ते अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. मागील निवडणुकीत भाजपचे (BJP) आमदार सागर मेघे यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीने माजी आमदार विजय घोडमारे पाटील यांना उमेदवारी दिली होती. ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे सर्वच पक्षातील नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध असल्याने त्यांच्या विरोधात कोणी सहजासहजी जात नाही. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत आमदार समीर मेघे यांच्या एका भाषणाने माजी मंत्री सुनील केदार चांगलेच दुखावले आहेत. त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत समीर मेघे यांचा हिशेब चुकता करण्याची घोषणा केली आहे.

चर्चांना उधाण

हिंगण्यामध्ये झालेल्या लोकसभेच्या विजयोत्सवात त्यांनी उघडपणे मेघे यांना चॅलेंज दिले आहे. एवढेच नव्हे, तर मी स्वत: लढलो, तर तुम्हाला चालेल का? अशी थेट विचारणा महाविकास आघाडीचे नेत्यांना केली होती. हे बघून मेघे यांचे काही खरे नाही, अशी चर्चा हिंगणा मतदारसंघात रंगली आहे. मात्र शिवेसना ठाकरे पक्षाच्या दाव्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचा उत्साह मावळत चालला आहे.

यापूर्वी युवा सेनेचे पदाधिकारी नागपूरमध्ये येऊन गेले. त्यावेळीसुद्धा शिवसैनिकांनी हिंगणा मतदार संघ मागावा, अशी मागणी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे केली होती. उद्धव ठाकरे यांचा आग्रह आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले त्यांचे संबंध बघता हिंगणा शिवसेनेसाठी सोडावा लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हिंगण्याच्या बदल्यात पूर्व नागपूरची मागणी केली जात असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT