Nagpur Congress Committee Meeting Sarkarnama
विदर्भ

Nagpur Congress : नागपूर काँग्रेसच्या बैठकीत बंडखोरांना मानाचे पान; पण कार्यकारी अध्यक्षांना निमंत्रणही नाही

Zillha Parishad Election Meeting : विधानसभेच्या निवडणुकीत सुनील केदारांच्या पत्नी अनुजा केदार यांचा सावनेर मतदारसंघात पराभव झाला. निवडणुकीपूर्वी घेण्यात आलेल्या मुलाखतीत केदारांच्या हस्तक्षेपामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष उफाळून आला होता.

Rajesh Charpe

Nagpur, 28 January : विधानसभेच्या निवडणुकीत नागपूर जिल्ह्यात मोठा पराभव झाल्यानंतरही काँग्रेसचे नेते आपपसांतील मतभेद आणि हेवेदावे विसरायला तयार नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात बोलावण्यात आलेल्या काँग्रेस कमिटीच्या बैठकीला कार्यकारी अध्यक्ष बाबा आष्टणकर यांना बोलावण्यात आले नव्हते.

दुसरीकडे, बंडखोरी केली म्हणून पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले माजी अध्यक्ष राजेंद्र मुळक मात्र या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) आणि रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला होता. त्यावरून ‘सुंभ जळाला; पण पीळ कायम' अशी अवस्था सध्या नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत नागपूर (Nagpur) ग्रामीणमधील सहापैकी फक्त एक विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला जिंकता आला आहे. केदारांच्या पत्नी अनुजा केदार यांचा सावनेर विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. निवडणुकीपूर्वी घेण्यात आलेल्या मुलाखतीत केदारांच्या हस्तक्षेपामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष उफाळून आला होता. केदारांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊ दिल्या नाहीत.

महाविकास आघाडी असताना रामटेक विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध राजेंद्र मुळक यांना बंडखोरी करायला लावली. त्यांच्यासाठी केदारांनी जाहीर प्रचारही केला. दुसरीकडे हिंगणा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे असताना त्यावरही दावा केला होता. केदारांनी आपल्या समर्थकांना उमेदवारी दाखल करण्यासही सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश बंग यांच्यावर निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दबाव टाकला होता.

उमरेडमध्येही त्यांनी अनेक इच्छुकांना कामाला लावले होते. यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली होती. बंडखोरी केल्याने राजेंद्र मुळक यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या ऐवजी प्रभारी अध्यक्ष म्हणून बाबा आष्टणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असताना केदार व त्यांच्या समर्थकांनी त्यांना बैठकीला बोलावण्याचे साधे सौजन्य दाखवले नसल्याचे समोर आले आहे.

त्या बैठकीशी माझा संबंध नाही : आष्टणकर

बाबा आष्टणकर यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक झाल्याचे सांगितले. मात्र, ती बैठक कोणी बोलावली, त्याच काय झाले हे मला माहीत नाही. त्या बैठकीला आपल्याला बोलावण्यात आले नव्हते. बैठक बोलावयची याबाबतसुद्धा विचारणा करण्यात आली नाही. काँग्रेस कमिटीच्या वतीने जय बापू, जय भीम आणि जय संविधान कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी काटोल तालुक्याची बैठक कोंढाळी येथे बोलावण्यात आली होती. आपण त्या बैठकीत होतो. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीशी आपला संबंध नसल्याने बाबा आष्टणकर यांनी सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT