
Mumbai, 28 January : रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा धुमसता वाद अखेर आज (ता. 28 जानेवारी) मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोचला. या दोन्ही ठिकाणच्या वादाची राज्याच्या मंत्रिमंडळात चर्चा झाल्याची माहिती आहे. या दोन्ही ठिकाणच्या वादावर येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज (ता. 28 जानेवारी) बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक होती. त्या बैठकीत पालकमंत्रिपदाच्या (Guardian Minister) वादाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यामध्ये पालकमंत्रिपदाच्या मुद्यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत भारतीय जनता पक्ष (BJP) अजूनही आग्रही आहे. ते सध्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे राहावे, यासाठी भाजपकडून डावपेच आखले जात आहेत. रायगडसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत. मात्र, या दोन्ही ठिकाणी सहपालकमंत्री नेमता येतील का, याचीही पडताळणी केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे या वादावर सुवर्णमध्ये कसा काढतात, हे पाहावे लागेल. यासंबंधीची बातमी एका मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे.
महायुतीमध्ये पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीवरून जोरदार असंतोष असल्याचे दिसून आले आहे. विशेषतः रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना प्रचंड आग्रही होती. मात्र आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रिपद देण्यात आल्याने महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली. तो वाद अगदी रास्ता रोको आंदोलन करण्यापर्यंत पोचला. शिवसैनिकांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली, त्यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्ती स्थगिती देण्यात आली.
पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती मिळाली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या जोरदार वाद रंगला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांना आव्हानाची भाषा केली जात आहे. तटकरे यांच्यावर शिवसेनेचे गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे हे आमदार तुटून पडले आहेत. मात्र, राष्ट्रवादीकडून हा प्रश्न मुख्यमंत्र्यांपुढे मांडला जाईल, असे सांगण्यात येत होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ यांनीही पालकमंत्रिपदाबाबत नाराजीचा सूर लावलेला आहे. त्यामुळे आगामी काळात पालकमंत्रिपदांची अदलाबदल होते का?, हे पाहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.