Sarkarnama
विदर्भ

BJP Leader : भाजपमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केलेले नेते मुख्यमंत्र्यांसोबत; फोटो व्हायरल, विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये केली होती बंडखोरी

Expelled BJP leaders meet Devendra Fadnavis : भाजपमधून सहा वर्षांसाठी निष्कासित केलेल्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. या भेटीनंतर भाजप त्यांचे निष्कासन मागे घेणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामा ब्युरो

भाजपमधून 6 वर्षांसाठी निष्कासित करण्यात आलेल्या दोन नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दिवाळीनिमित्त या नेत्यांनी नागपूर येथे मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपमधील राजकीय समीकरणांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आता या दोन्ही नेत्यांचे पक्षातील निलंबन मागे घेतले जाणार का, यावर उत्सुकता आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली होती. भाजपच्या शिक्षक आघाडीच्या नेत्या संगीता शिंदे यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेल्या संगीता शिंदे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात निवडणूक लढवल्याने भाजपने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निष्कासित करण्यात आले.

या प्रकरणात अमरावती जिल्हा भाजपचे सरचिटणीस नितीन गुडधे यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. संगीता शिंदे यांच्या प्रचारात सहभागी झाल्याचा ठपका ठेवत भाजपने त्यांनाही 6 वर्षांसाठी पक्षातून निष्कासित केले होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे भाजपमधील राजकीय भवितव्य अनिश्चित झाले होते.

मात्र, आता दिवाळीच्या निमित्ताने संगीता शिंदे आणि नितीन गुडधे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. नागपूर येथे झालेल्या या भेटीचा फोटो नितीन गुडधे यांनी स्वतः फेसबुकवर शेअर केला आहे. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

या भेटीमुळे भाजपमधील नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर या दोन्ही नेत्यांचे पक्षातील निष्कासन मागे घेतले जाणार का, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, यासंदर्भात भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठी आता काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT