Abdi; Sattar
Abdi; Sattar Sarkarnama
विदर्भ

Farmers : शेतकऱ्यांनी मोबाईलने फोटो काढून पाठवले, तरी ग्राह्य धरले जाणार नुकसान !

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Legislative Council News : मागील आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस आणि काल झालेली गारपीट, यांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पंचनामे करायला कर्मचारी नाहीत, अशी आजची स्थिती आहे. पण त्याने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईवर काहीही परिणाम होणार नाही, अशी घोषणा आज कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत केली. (Compensation will not be affected)

गारपिटीने झालेल्या नुकसानाबाबत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, अभिजित वंजारी, महादेव जानकर आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्‍न उपस्थित केले. एकनाथ खडसे म्हणाले, विमा कंपन्या ज्या पद्धीने पंचनामे करतात. त्याने काहीही होणार नाही. आणखी ८ दिवस झाले की फळं तसेच राहणार नाहीत. शेतांची सफाई होईल. मग पंचनाम्यात नुकसान दिसणारच नाही.

बकऱ्या, मेंढ्या मेल्या त्याचा पैसा शेतकऱ्यांना मिळाला नाही. सरकारकडून मदत मिळाली पाहिजे, ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. सरसरकट अनुदान द्या, ते देत नसाल, तर काय करणार, याचा निर्णय सरकारने घेण्याची आवश्‍यकता आहे. निसर्ग मारायला उठला, अन् सरकारही. हजाराच्या वर आत्महत्या एक-एका जिल्ह्यात होत आहे. आत्महत्या एक जरी झाली, तर सरकारने राजीनामा दिला पाहिजे, असे खडसेंनी सुनावले

कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणतात, ‘रोज की बात है, काही नवीन नाही.’ मेल्यावर दोन लाख रुपये देतात. कुटुंबाला १० लाख दिले पाहिजे. शेतकऱ्याला वर्षाची मदत १२ हजार रुपये सरकार देणार आहे. महिन्याला एक हजार रुपये पडतील. राजा उदार झाला, असे म्हणायला काही हरकत नाही. मदत द्यायची तर पुरेशी दिली पाहिजे, असेही खडसे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या मागे संकटांची मालिका लागली आहे. पंचनामे आणि विमा या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पंचनामे सुरू झालेले नाहीत. मदत काय करणार, याबाबतीत सरकार संवेदनशील नाहीत, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. राज्यात ऋतुमानाचे कालचक्र बदलले. १५ दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आला. मोठे नुकसान झाले. काल गारपीट झाली, पण अवकाळी पावसाचेच पंचनामे पूर्ण झाले नाही.

फ्लायओव्हर, मेट्रो, बुलेट ट्रेन आपण करतो आहो, चांगली गोष्ट आहे. पण सिंचनाचे प्रकल्प अर्धवट आहेत. गोसेखुर्द पूर्ण झाला नाही, याकडे सरकारचे लक्ष आहे का, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर श्‍वेतपत्रिका काढणार आहात का, असा प्रश्‍न अभिजित वंजारी यांनी केला.

जनतेने तुम्हाला पंतप्रधानपद दिलं, मुख्यमंत्रिपद दिलं. कृषी विद्यापीठे हत्ती आहेत का. गारपीट होणारच, दुष्काळ पडणारच. कृषी विद्यापीठांनी काय मदत केली पाहिजे. हे कोण बघणार? एक एका साइंटीस्टला अडीच लाख रुपये पगार आहे. कृषी मंत्र्यांनी अभ्यास केला पाहिजे. जेवढी माणसं आहेत. त्याच्या दुप्पट जनावरे आहेत. अब्दुल सत्तार यांचा मुलगा इंजिनिअर असेल तर डाळिंबावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाचे काम त्यांच्या मुलाला दिले पाहिजे.

उदय सामंत (Uday Samant) आणि अब्दुल सत्तार यांनी बैठक घेऊन हे सर्व केले पाहिजे. काही पत्रकार आणि खडसेंसारख्या अनुभवी लोकांनाही त्यामध्ये घेतले पाहिजे. आम्हाला तीन टक्के पाणी मिळते. अशा योजनांवर पुन्हा विचार झाला पाहिजे. ही सरकार आणि ती सरकार, अशी टिका करणार नाही. पण केवळ मलमपट्टी करू नका, तर पूर्ण ऑपरेशन करा, असे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी सांगितले.

मोबाईलवर नुकसानाचा फोटो जरी पाठवला, तरी आपण नुकसान ग्राह्य धरू. पंचनामे करताना ते ग्राह्य धरले जाईल. सरकार एकाही शेतकऱ्याला (Farmer) वाऱ्यावर सोडणार नाही, असे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सदस्यांच्या संतप्त भावना ऐकल्यानंतर सभागृहाला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT