Farmer's Protest in Amravati. Sarkarnama
विदर्भ

Amravati : पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक, कंपनीच्या अधिकाऱ्यावर उगारली खुर्ची

Amar Ghatare

Crop Insurance : पीक विम्याच्या मुद्द्यावर आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यावर खुर्ची उगारल्यानं अमरावती येथे सोमवारी (ता. २०) खळबळ उडाली. अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी आलेल्या पोलिस आणि आंदोलकांमध्येही यावेळी चांगलीच बाचाबाची झाली. या घटनेमुळं कृषी अधीक्षक कार्यालयात चांगलाच तणाव निर्माण झाला होता.

लोकविकास शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वात पीक विम्यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. सोमवारी शेतकरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी त्यांनी कृषी अधीक्षक राहुल सातपुते व विमा कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपल्या ताब्यात घेतलं. (Farmers Got Aggressive In Amravati Due To No Benefits Of Crop Insurance Tried To Beat Company Officials)

अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर फळ पिकांचं नुकसान झालं असहे. यात सर्वाधिक संत्र्याचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांना यासाठी पीक विमा मिळणे अपेक्षित होतं. मात्र दिवाळी उलटल्यानंतरही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ न मिळाल्यानं संताप व्यक्त होत आहे. अशात लोकविकास शेतकरी संघटनेमार्फत अमरावतीमध्ये शेतकऱ्यांसह आंदोलन करण्यात आलं.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसह अमरावती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गाठलं. शेतकऱ्यांनी एकत्र येत पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावण्याची मागणी केली. पीक विमा कंपनीचे अधिकारी कार्यालात आल्यानंतर शेतकरी पीक विमा अधिकारी व कृषी अधीक्षकांशी चर्चा करीत होते. अशात शेतकरी अचानक संतप्त झालेत व त्यांनी अधिकाऱ्यांवर खुर्ची उगारली. याप्रकारामुळं खळबळ उडाली. पोलिसांनीही कृषी अधीक्षक कार्यालय कार्यालय गाठत शेतकऱ्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक व पोलिसांमध्येही बाचाबाची झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेतकऱ्यांनी आक्रमक होत पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन तासापेक्षाही जास्त वेळ डांबून ठेवलं. जिल्ह्यातील 3 हजार 156 शेतकऱ्यांना फळ पिकाचा 10 कोटी 71 लाख रुपयांचा फळ पीक विमा मंजूर झाला आहे. मात्र तो अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळं फळ पीक विमा मिळणार नाही, तोपर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व पीक विमा अधिकाऱ्यांना कार्यालयातून बाहेर जाऊ देणार नाहीख् अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यामुळं पोलिसांना याप्रकरणी मध्यस्थी करावी लागली. अधिकाऱ्यांनी विम्याची रक्कम तत्काळ जमा करण्याचे आश्वासन दिल्यानं आंदोलक माघारी फिरले.

सध्या विदर्भात अनेक ठिकाणी पीक विम्याच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू आहे. अकोला, बुलढाणा, वाशीम जिल्ह्यातही विविध राजकीय पक्ष व शेतकरी आक्रमक झाले आहेत. अमरावतीमध्येही आंदोलनानं जोर धरलाय. प्रशासनाने पीक विमा मंजूर केल्यानंतरही कंपन्या शेतकऱ्यांना रक्कम देत नसल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT