Sant Gadge Baba Amravati University : पश्चिम विदर्भातील महत्वाचं विद्यापीठ असलेल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर वर्णी लागावी, यासाठी अर्ज दाखल करणाऱ्यांपैकी अनेकांनी आता राजभवनातील राज्यपाल कक्षापर्यंत कसं पोहोचता येईल, या मार्गाचा शोध सुरू केलाय. ‘टॉप फाइव्ह’मध्ये नाव यावं यासाठी लॉबिंगही सुरू झालीय. स्पर्धेत कोण बाजी मारणार याबद्दल शिक्षण वर्तुळात उत्सुकता आहे.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनानंतर हे पद रिक्त आहे. सध्या या पदाचा अतिरिक्त कार्यभार औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे आहे. राज्यातील चार विद्यापीठांच्या कुलगुरू पदाचा प्रभारही डॉ. येवले यांच्याकडं होता. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, रामटेकचे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, परभणीचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची जबाबदारी डॉ. येवले यांनी पेलली. त्यापैकी आता केवळ अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर निवड तेवढी बाकी आहे. (Political Lobbying Started For Vice Chancellor Post of Sant Gadge Baba Amravati University of Maharashtra)
अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी सद्य:स्थितीत १०० अर्ज ऑनलाईन स्वरुपात प्राप्त झाले आहेत. शुक्रवारी (ता. १७) अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. अर्ज करणाऱ्यांमध्ये विद्यापीठाचे विद्यमान प्र-कुलगुरू तथा अमरावती विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रसाद वाडेगावकर, अमरावती विद्यापीठाचे विधी विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार चौबे, अमरावती विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, अमरावती विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत विभागाच्या प्रमुख डॉ. वैशाली गुडधे, अमरावतीच्या बियाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक धोटे, अमरावतीच्या विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मीता देशमुख, विद्यापीठाच्या आंतरविद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे यांचाही समावेश आहे.
विद्यापीठांमधील कुलगुरू पदांवर होणारी नियुक्ती बऱ्याच काळापर्यंत अराजकीय स्वरूपाची होती. परंतु कालांतराने त्यातही राजकारणाचा शिरकाव झाला. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठही या राजकारणातून सुटलेले नाही. ज्या उमेदवाराचं राजकीय वजन जितकं जास्त त्याची कुलगुरू पदावर वर्णी लागल्याची शक्यता तितकीच अधिक. त्यामुळंच महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात विद्यापीठ कायद्यात बदल करण्याच्या हालचालींनी वेग धरला होता. ज्याला त्यावेळच्या विरोधी पक्षानं तीव्र विरोध केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अमरावती विद्यापीठात नागपूर युनिव्हर्सिटी टिचर्स असोसिएशनचं (नुटा) चांगलच वर्चस्व आहे. विधान परिषदेतील अमरावती पदवीधर मतदार संघावरही नुटाचे प्रा. भाऊराव तुळशीराम अर्थात बी. टी. देशमुख यांचं अनेक वर्ष वर्चस्व होतं. विदर्भातील विद्यापीठांमध्ये कुलगुरूपदासाठी राजकीय ‘लॉबिंग’ करायची झाल्यास संबंधित उमेदवाराचे नुटा आणि राज्याची उपराजधानी नागपूरशी दमदार ‘कनेक्शन’ अलीकडच्या काळात गरजेचं झालय. त्यामुळं नुटा आणि नागपूर यांना चालणारा व्यक्तीच अमरावती व नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर निवडला जातो हे सर्वश्रूत आहे. त्यामुळं अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आता हे ‘कनेक्शन’ जुळविण्यासाठी ‘फिल्डिंग’ सुरू केलीय. आलेल्या अर्जांमधुन पात्र ठरणाऱ्या पाच व्यक्तींची नावं राजभवनात गेल्यानंतरच हे चित्र स्पष्ट होणार आहे.
अमरावतीत दुसरं विद्यापीठ
अमरावती जिल्ह्यात अलीकडेच शासनानं रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेची घोषणा केलीय. देशातील महानुभव पंथाचं हे प्रमुख केंद्र आहे. मराठी भाषेतील आद्यग्रंथ लिहिला ते वाजेश्वरी स्थान रिद्धपुरात आहे. त्यामुळं पश्चिम विदर्भात आणखी एका विद्यापीठाची भर पडणार आहे. सध्या या भागात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आणि अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यरत आहे. नव्यानं होत असलेल्या विद्यापीठासाठीही काहींनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत.
Edited by : Prasannaa Jakate
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.