MLA Indranil Naik and MLA Dr. Wajahat Mirza
MLA Indranil Naik and MLA Dr. Wajahat Mirza Sarkarnama
विदर्भ

मतदारसंघातील शेतकरी संकटात आणि ‘हे’ दोन आमदार दुबईच्या क्रिकेट मैदानात !

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा बांध फुटला असताना त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन सांत्वन करण्याऐवजी पुसदच्या काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन क्रिकेट शौकीन आमदारांनी क्रिकेट मॅचचा आनंद लुटण्यासाठी थेट दुबई गाठली. दुबईच्या स्टेडियममधील क्रिकेटचा आस्वाद घेणाऱ्या या आमदारांचा फोटो समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आता त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेल्या पिकाचे अतिवृष्टी व परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अत्यंत विदारक परिस्थितीत सापडले आहेत. हातचे पीक गेल्याने आपले हात शेतकऱ्यांनी कपाळाला लावले आहेत. लोकप्रतिनिधींनी अशावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देण्याची गरज आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. दसऱ्यानंतर दिवाळी पुढ्यात आली आहे. दिवाळी कशी साजरी करावी, असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे.

लोकप्रतिनिधींनी अशावेळी सरकार दरबारी शेतकऱ्यांचा प्रश्न लावून दिलासा देण्याची गरज आहे. मात्र लोकप्रतिनिधीच अशा संकटसमयी क्रिकेट एन्जॉय करण्यासाठी दुबई सारख्या देशात जात असतील तर, शेतकऱ्यांनी कुणाकडे पहावे, असा प्रश्न विचारला जात आहे. पुसद येथील आमदार इंद्रनील नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा हे त्यांच्या मित्रांसमवेत रविवारी दुबईच्या स्टेडियममध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच पाहताना मोबाईलवर कॅमेराबद्ध झाले आणि हा फोटो व्हाट्सॲप ग्रुप वरून व्हायरल झाला. त्यावर अतिवृष्टीपेक्षा जोरदार कॉमेंट्सचा पाऊस पडू लागला आहे.

कुठे शेतकऱ्याचा बांध...आम्हाला तर क्रिकेटचा नाद !’ अशी टीका होऊ लागली. डिजिटल मीडियावर चर्चा झडू लागली. बरेचदा हे आमदार क्रिकेट पाहण्यासाठी श्रीलंका व इतर देशांत वेळोवेळी जाऊन आले आहेत. मात्र ही वेळ दुबई जाण्याऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर सांत्वन करण्याची असताना आमदार क्रिकेटच्या प्रेमात वेडे झालेले आहेत. अशा वेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना टीकेची झोड उठवण्यासाठी आयते कोलित मिळाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी समाज माध्यमातून या आमदारांच्या वागणुकीचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.

भाजपाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी लोकप्रतिनिधींनी कोणत्या परिस्थितीत कसे वागावे, याचे भान ठेवले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. एक मात्र झाले की, पाकिस्तानने भारताचा पराभव केला आणि टीकेची झोड मात्र, पुसदच्या दुबईला गेलेल्या आमदारांवर उडविण्यात आली. आमदार झाले म्हणून काय झाले. त्यांनाही व्यक्तिगत जीवन असतेच, असे समर्थन करतानाच कुठल्या परिस्थितीत काय करावे, याचे भान ठेवावे, असा सल्लाही नेटकरी मंडळींनी या आमदारांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT