Gopal Tirmare, Bacchu Kadu
Gopal Tirmare, Bacchu Kadu sarkarnama
विदर्भ

'पीए'मुळे बच्चू कडूंना कारावासाची शिक्षा ; गोपाल तिरमारेंमुळे प्रकरण उघडकीस

सरकारनामा ब्युरो

अमरावती : महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षण व महिला, बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu)यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे(Gopal Tirmare) यांनी २०१७ मध्ये बच्चू कडू यांच्याविरोधात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

बच्चू कडू यांना या प्रकरणामुळे अडचणीत आणणारे गोपाल तिरमारे कोण आहेत, याची चर्चा सध्या सुरु आहे. न्यायालयाने दोषी ठरवलेले मंत्री बच्चू कडू यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी याचिकाकर्ते गोपाल तिरमारे यांनी केली.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी मुंबई येथील फ्लॅटबद्दलची माहिती प्रतिज्ञापत्रात लपवल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच कारावासासोबत त्यांना २५ हजारांचा दंडही भरावा लागणार आहे.

बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या स्थापनेपासून त्यांच्या सोबत असलेले आणि त्यांचे स्वीय सहाय्यक आणि त्यांच्या विरोधात जाऊन नंतर नगरसेवक बनलेले व्यक्ती म्हणजे गोपाल तिरमारे.

बच्चू कडू यांच्या अनेक आंदोलनात मी कार्यकर्ता आणि स्वीय सहाय्यक म्हणून सोबत होतो. तसेच २००७ पासून मी त्यांच्या सोबत काम करत आहे. लोकवर्गनीतून निवडणूक लढतो असं बच्चू कडू सांगतात पण त्यांच्याकडे विविध संस्था आहे त्यामुळे यातून त्यांनी बेनामी संपत्ती गोळा केली आहे, असा आरोप तिरमारे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

बच्चू कडू आणि गोपाल तिरमारे यांच्यातील मतभेद वाढत जाण्याचे मुख्य कारण म्हणजे नगरपरिषद पोटनिवडणूक. नगरपरिषद पोटनिवडणुकीसाठी २०१५ मध्ये मतदान झाले. यावेळी प्रहारने मनिषा नागलिया यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु, वेळेवर सुनिता गणवीर यांना मतदान करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी गोपाल तिरमारेसह तीन नगरसेवकांनी मनीषा यांनाच मतदान केले आणि नांगलिया यांचा विजयही झाला. त्यामुळे बंडखोरी प्रकरणी गोपाल तिरमारे यांच्यासह तीन नगरसेवकांवर सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई सुरू झाली. त्यानंतरच बच्चू कडू आणि गोपाल तिरमारे यांच्यातील मतभेद वाढत गेले.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅटबद्दलची माहिती लपवणं बच्चू कडूंना महागात पडली आहे. गोपाल तिरमारे यांनी 2017 मध्या बच्चू कडू यांच्याविरोधात याप्रकरणी तक्रार केली होती. कडू यांनी मुंबईत 42 लाख 46 हजार रुपयांचा मालकीचा फ्लॅट असतानाही 2014 ची विधानसभा निवडणुकीवेळी या फ्लॅटबद्दलची माहिती निवडणूक आयोगाला दिली नाही, असा आरोप बच्चू कडूंवर होता. याच आरोपांवरुन 2017 मध्ये कडूंविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वे गुन्हा दाखल झाला होता.

बच्चू कडू यांनी त्यावेळी या प्रकरणातील सर्व आरोप फेटाळले होते. राजयोग सोसायटीने सर्व आमदारांना घर उपलब्ध करुन दिले होते. त्यासाठी बँकेचे 40 लाख रुपये कर्जसुद्धा उपलब्ध करुन देण्यात आले होते. पण कर्जाची परतफेड न होऊ शकल्याने चार महिन्यांच्या आधी ते विकण्यात आल्याचा दावा बच्चू कडूंनी त्यावेळी केला होता. त्यामुळे आपल्यावरील सर्व आरोप खोटे होते, असं स्पष्टीकरण बच्चू कडूंनी 2017 मध्ये केलं होतं.

बच्चू कडू यांच्याविरोधात या प्रकरणी तक्रार करणारे तत्कालीन नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी माहिती अधिकार कायद्यान्वे संबंधित यंत्रणेकडून माहिती मिळवली होती. त्यातून हा सर्व प्रकार उघडकीस आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT