Sanjay Gaikwad Sarkarnama
विदर्भ

Sanjay Gaikwad : न्यायालयाच्या आदेशांनंतर अखेर आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल

Fahim Deshmukh

Sanjay Gaikwad : एका महिलेची शेतजमीन हडपून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली न्यायालयाने 17 फेब्रुवारी रोजी बुलढाण्याचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड त्यांचा मुलगा मृत्युंजय ऊर्फ कुणाल गायकवाडसह आणखी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. बोराखेडी पोलिस प्रशासन आमदाराच्या दबावात गुन्हा दाखल करण्यास चालढकल करीत होते. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने आता पोलिसांच्या विरोधात पुन्हा फिर्यादीकडून न्यायालयात जाण्याची तयारी सुरू असतानाच पोलिसांनी बुधवारी (ता. 28) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

आपल्या गळ्यातील हारात वाघाचा दात असल्याचा दावा संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. वाघाची शिकार आपण स्वतः केल्याचा दावाही आमदारांनी केल्यानंतर वन विभागाकडून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आमदाराजवळील वाघाची दातसदृश वस्तू वन विभागाने ताब्यात घेत डेहराडून येथील ‘वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट’मध्ये डीएनए तपासणीसाठी पाठविली आहे. अहवाल प्राप्तीनंतर गायकवाड यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. आता बुलढाणा मतदारसंघात येणाऱ्या मोताळा शेतशिवारातील आपण देत असलेल्या भावात शेतजमीन नावावर करून द्यावी लागेल, असा तगादा आणि या जमिनीवर अतिक्रमण करून फार्महाऊस बांधल्याचा आरोप गायकवाड यांच्याविरोधात करण्यात आला आहे. रिटा यमुनाप्रसाद उपाध्याय (रा. नागपूर) असे या तक्रारकर्त्या महिलेचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील राजूर गावात त्यांची दीड एकर शेती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार गायकवाड यांनी 21 जुलै 2021 रोजी त्यांच्या शेतजमिनीवर अतिक्रमण केले. दबंगगिरीच्या जोरावर उपाध्याय यांच्या शेतजमिनीवरची कुंपणे त्यांनी काढून फेकली. तेथे त्यांनी अवैधरित्या फार्महाऊस बांधला. शेतजमिनीत खोदकाम केले. त्यातून मुरूम काढला. तक्रारकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला. तेव्हा त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. झालेल्या अन्यायाविरोधात आमदार संजय गायकवाड यांच्यासह काही जणांविरोधात 12 ऑगस्ट 2021 रोजी महिलेने बोराखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी उपाध्याय यांनी मोताळा न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. न्यायालयाने प्रकरणाची बाजू तपासून फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. न्यायदंडाधिकारी एस.पी. पांडव यांनी 17 फेब्रुवारी रोजी हे आदेश दिलेत.

न्यायालयाच्या आदेशाचा कोणताही परिणाम बोराखेडी पोलिसांवर पडलेला दिसत नव्हता. आदेश देऊन 10 दिवसांचा अवधी झालेला असतानासुद्धा यामध्ये कारवाई झाली नाही. याबाबत तक्रारकर्त्या महिलेने पोलिसांशी संपर्क साधून कारवाईची विनंती केली. मात्र पोलिस बंदोबस्तात व्यस्त आहेत. नंतर बघू असे सांगण्यात आले. यामुळे न्यायालयाच्या आदेशाची अवमानना होत असल्याने आपण पोलिसांविरोधात गुरुवारी दाद मागणार असल्याचे रिटा उपाध्याय यांनी सांगितले होते. याबाबतची कुणकुण लागताच बोराखेडी पोलिस कामाला लागले. ठाणेदारांनी या संदर्भात बुलढाण्यात भेट दिली. त्यानंतर आमदार संजय गायकवाड, मृत्युंजय ऊर्फ कुणाल संजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दीपाली चौबे, ज्ञानेश्वर वाघ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्वसामान्य व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला की, त्याची माहिती लगेच सोशल मीडिया, वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धीला येते. याबाबतची माहिती पोलिस पत्रकारांसह वरिष्ठाना देतात. मात्र बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या प्रकरणात तसे झालेले नाही. रात्री 10.30 वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. स्टेशन डायरीवर असलेल्या अंमलदाराला गुन्ह्याची माहिती कुणाला देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. गुन्ह्याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही वरिष्ठांकडून घ्या, असे उत्तरे मिळाले. यामुळे याप्रकरणात न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल झाला असला तरी पोलिसांकडून मात्र कोणाला पाठिशी घालण्यात येत आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT