Deer Hunting in Gadchiroli Sarkarnama
विदर्भ

Deer Hunting : सरपंचाने केली चितळाची शिकार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Gadchiroli Forest Action : सिमावर्ती सिरोंचा भागातील वडधम गावातील प्रकार. वन विभागाकडून आरोपींचा शोध सुरू. पथकांकडून मोहिम

संदीप रायपूरे

Deer Hunting : एकीकडे वन्यजीव रक्षणासाठी वनविभाग व निसर्ग संस्था जनजागृती करीत असताना दुसरीकडे मात्र वन्यजीवांच्या शिकारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गडचिरोलीचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना बऱ्याच वर्षापूर्वी अवैध शिकारीप्रकरणी मोठी किंमत चुकवावी लागली होती. त्यांना मंत्रिपदही गमवावे लागले होते. अशातच आता जिल्ह्यातील सिमावर्ती भागातील एका सरपंचाने चितळाची शिकार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आता वनविभागाने सरपंचांसह तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत. कारवाईची कुणकुण लागताच सरपंच फरार झाला आहे. वनविभागाचे पथक आरोपी सरपंचाच्या शोधात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा या सिमावर्ती तालुक्यातील वडधम गावात हा प्रकार घडला.

गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल 76 टक्के परिसर जंगलव्याप्त आहे. मोठ्या प्रमाणावर जंगल असतानाही या परिसरात वन्यजीवांची संख्या फार कमी आहे. अशात शिकारीचे प्रमाण वाढू लागल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये चिंता वाढली आहे. सिरोंचा तालुक्यातील वडधम गावालगत असलेल्या जंगलात जिवंत विद्युत तार सोडून चितळाची शिकार करण्यात आली. वनविभागाचे पथक गस्तीवर असताना अचानकपणे विद्युत लाइन ट्रिप झाली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी अधिक चौकशी केली असता चितळाची शिकार झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणाचा तपास केल्यानंतर सरपंच समय्या किष्टय्या सिंगनेनी, सवेश्वर समय्या आकुला, राकेश मलय्या जेट्टी, राजेश्वर सवेश्वर आकुला या चौघांचा शिकारीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. वनविभागाच्या पथकाने जंगलात पहाणी केली असता चितळाचे शिर आढळून आले. त्यानंतर सरपंचासह एकूण चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरोपींविरुद्ध गडचिरोली वन विभागाकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. सरपंच समय्या सिंगनेनी हा फरार झाला. आता वनविभाग फरार सरपंचाचा शोध घेत आहे. अटक केलेल्या तीन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना वनकोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी एस. जी. सुरपाम यांच्या नेतृत्वाखाली वनपाल डी. बी. आत्राम, वनरक्षक आर. वाय. तलांडी, डी. यु. गिते, एस. एस. चौधरी, व्ही. ए. काटींगल, आर. के. आत्राम यांनी केली.

‘फिल्मी स्टाइल’ अटक

चितळाची शिकार केल्यानंतर आरोपींची माहिती वनविभागाला मिळाली. वनविभाग कोणत्याही क्षणी आपणास अटक करू शकते याची कुणकुण आरोपींना लागली. त्यामुळे गोदावरी नदीपात्रातून तेलंगणात पळून जाण्याचा त्यांचा बेत होता. याचदरम्यान वनविभागाच्या पथकाने ‘फिल्मी स्टाइल’ने गोदावरी नदीपात्र गाठत सवेश्वर आकुला, राकेश जेट्टी या आरोपींना ताब्यात घेतले. सरपंच समय्या सिंगनेनी मात्र पळून जाण्यात यशश्वी झाला. त्याचा शोध घेतला जात आहे.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT