Bhandara Zilla Parishad. Google
विदर्भ

Bhandara : अपहार भोवला, गणेशपूरच्या माजी सरपंचासह ग्रामविकास अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

अभिजीत घोरमारे

Ganeshpur Gram Panchayat : शासनाच्या विविध विकास योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या निधीत बनावट कागदपत्रे तयार करून 51 लाख 14 हजार रुपयांच्या अपहार करणाऱ्या भंडारा लगतच्या गणेशपूर येथील ग्रामविकास अधिकारी आणि माजी सरपंचाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामविकास अधिकारी श्याम बिलवणे (वय 48, रा. खात रोड, भंडारा) आणि माजी सरपंच मनीष गणवीर (वय 55, रा. गणेशपूर) यांच्याविरुद्ध हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संगनमताने फसवणूक केल्याच्या कलमांचा यात समावेश आहे. गट विकास अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाच्या आधारे प्राप्त लेखी तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

ग्रामविकास अधिकारी श्याम बिलवणे आणि माजी सरपंच मनीष गणवीर यांचा कार्यकाळ 5 मे 2021 ते 1 नोव्हेंबर 2022 होता. या कालावधीत शासनाने विविध विकास कामांच्या योजना राबविण्यासाठी गणेशपूर ग्रामपंचायतीला निधी दिला होता. हा निधी विकास कामांसाठी वापरण्याऐवजी या दोघांनीही संगनमत करून वैयक्तिक फायद्यासाठी वापरला. त्यासाठी टप्प्याटप्प्याने बनावट कागदपत्रे तयार केली. ती खर्चानंतर जोडली.

भंडाऱ्याचे गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे यांनी या प्रकाराची चौकशी केली. चौकशीत 51 लाख 14 हजार 500 रुपयांचा गैरप्रकार झाल्याचे पुढे आले. भंडारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात गैरप्रकार स्पष्ट झाल्याने त्यांनी भंडारा पोलिसात लेखी तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गणेशपूरचे विद्यमान सरपंच विद्या मेहर यांच्यावरही या चौकशी अहवालामध्ये ठपका ठेवण्यात आला आहे. कर्तव्यात कसूर करून ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या संगनमताने त्यांनी नियमबाह्य कामे केल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यांनी केलेला खर्चही संशयित असल्याचे अहवालात नमूद आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 नुसार विद्यमान सरपंच विद्या मेहर कारवाईस पात्र ठरतात, असा निष्कर्षही चौकशीच्या अहवालात स्पष्टपणे देण्यात आला आहे. त्यामुळे गणेशपूर प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भंडारापासून जवळच असलेल्या गणेशपूर गावाची लोकसंख्या सुमारे 20 हजाराच्या आसपास आहे. वैनगंगा नदीजवळ असलेल्या या गावात साक्षरतेचे प्रमाण भक्कम आहे. ग्रामपंचायत अंतर्गत सहा वॉर्ड आहेत. गावात दोन शासन अनुदानप्राप्त शाळा आहेत. जिल्हा परिषदेची शाळाही गावात आहे. भंडारा तालुक्यातील ही ग्रामपंचायत राजकीय दृष्टीनेही महत्त्वाची मानली जाते. मात्र आता ग्रामपंचायतीत गैरप्रकार उघड झाल्याने पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT