MP Balu Dhanorkar
MP Balu Dhanorkar Sarkarnama
विदर्भ

Balu Dhanorkar : पाच लाखाने काही होणार नाही; कुटुंबातील सदस्याला रेल्वेत नोकरी द्या...

Atul Mehere

नागपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर फूट ओव्हर ब्रिज तुटल्याने झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. नीलिमा रंगारी, असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. राज्य सरकारने कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पण केवळ ५ लाखाच्या मदतीने काही होणार नाही. तर मृताच्या कुटुंबातील एका सदस्याला रेल्वेत नोकरी द्यावी, अशी मागणी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.

संबंधित रेल्वे अधिकारी व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे खासदार धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री (Chief Minister) सहाय्यता निधीतून अधिक भरीव तरतूद करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) येत्या १ डिसेंबरला भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चंद्रपूर (Chandrapur) आणि बल्लारशा रेल्वे स्थानकाला सुंदर रेल्वे स्थानकाचे नामांकन देण्यात आले होते. मात्र सौंदर्यीकरणासोबत मजबुतीकरण झालेली नाही, असे या घटनेवरून दिसून येते. त्यामुळे रेल्वे ओवर ब्रिजचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी देखील मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे.

ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आज खासदार धानोरकर यांनी डॉ. मानवटकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. त्यासोबतच त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत नीलिमा रंगारी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार, शहर काँग्रेसचे अध्यक्ष रामू तिवारी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, माजी नगरसेवक भालचंद्र दानव, माजी नगरसेवक बापू अन्सारी, राहुल चौधरी यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी कुटुंबीयांना आर्थिक साहाय्य वाढवून देण्यासह कुटुंबातील एकाला रेल्वेमध्ये नोकरी मिळवून देण्याकरिता रेल्वे मंत्र्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

२ मे २०१८ मध्ये भारतातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकाची जोडी म्हणून चंद्रपूर - बल्लारपूरची निवड झाली होती. त्यावेळी लाखो रुपये फक्त रंगरंगोटीवर खर्च करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन रेल्वे मंत्रालयाने ही घोषणा केली होती. त्यामध्ये भारतातील सर्वोत्तम रेल्वे स्थानकामध्ये चंद्रपूर आणि बल्लारपूरचा प्रथम क्रमांक जाहीर झाला होता. परंतु त्यावेळी जर या रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिजचे फिटनेस तपासले असते तर आज ही दुर्दैवी घटना घडली नसती. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव यांच्याकडे केली आहे. सोबतच जिल्ह्यातील सर्व पुलांची तपासणी करून तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT