Lok Sabha Election 2024 : महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेला वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने तयारी सुरू केली आहे. वर्धा मतदारसंघ हा नेहमीच काँग्रेसच्या वाट्याला येतो. वर्धा येथील अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हा मतदारसंघ अन्य कोणत्याही पक्षासाठी सोडू नये असा आग्रह धरला आहे. असे असतानाही महाविकास आघाडीत वर्धा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तयारी सुरू केली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वाट्याला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अमरावती मतदारसंघाबाबत मात्र अनिश्चितता कायम आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार हर्षवर्धन देशमुख यांना शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा निरोप दिला आहे. त्यामुळे देशमुखांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद सुरू केला आहे. देशमुख हे तीनदा आमदार होते. दोनदा ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे वर्धा लोकसभा मतदारसंघात आता पुन्हा चांगलीच चूरस पहावला मिळणार आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वर्धा लोकसभा मतदार संघातील सहा मतदारसंघांपैकी चार वर्धा जिल्ह्यात आहेत. दोन अमरावती जिल्ह्याचे विधानसभा मतदारसंघ आहेत. वर्धेची जागा ही महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. त्यामुळेच पवारांनी मोर्शी विधानसभा मतदारसंघांचे माजी आमदार हर्षवर्धन देशमुख यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिला आहे. शरद पवार यांचे आदेश मिळताच देशमुख हे सध्या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. मतदारसंघाच्या समस्या जाणून घेत ते सोडविण्याचा प्रयत्न देशमुख करीत आहेत.
वर्धा लोकसभा मतदार संघ महात्मा गांधी यांच्या वास्तव्याचे तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या अनेक घडामोडीचा साक्षीदार आहे. पण आता हा मतदारसंघ आगामी लोकसभा निवडणुकीत मित्र पक्ष असलेल्या शरद पवार गटास जाण्याची चर्चा जोरात आहे. असा निर्णय झाल्यास तो अत्यंत चुकीचा ठरेल, असे स्थानिक काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. वर्धा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचा काहीच प्रभाव नाही. मतदारसंघ त्यांना सोडल्यास आघाडीची एक जागा कमीच होणार, असे नेत्यांनी पक्षाध्यक्षांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.
वर्धा मतदारसंघाची निवडणूक काँग्रेसनेच लढावी यासाठी स्पष्ट भूमिका घ्यावी, असे म्हणणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष चांदुरकर यांनी राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांना पाठविलेल्या पत्रातून म्हटले आहे. सुरुवातीपासून या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र 2019 पासून हा मतदार संघ भाजपच्या ताब्यात आहे. कमलनयन बजाज यांनी सर्वाधिक तीन टर्म विजय मिळविला. त्यानंतर वसंत साठेही तीन टर्म खासदार होते. रामदास तडस आता दोन टर्म या मतदार संघाचे खासदार आहेत. अलीकडेच या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीनेही सभा घेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. लोकसभा मतदार संघातील अनेक विधानसभा मतदार संघ भाजपच्या ताब्यात आहे. अशात भाजप आणि काँग्रेस एकमेकांना टक्कर देण्यासाठी मैदानात उतरले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.