Pratibhatai Patil - Raosaheb Shekhavat News
Pratibhatai Patil - Raosaheb Shekhavat News Sarkarnama
विदर्भ

Vidarbha Politics : निवडणूक काय हरले; माजी राष्ट्रपतींच्या सुपुत्राने पक्ष अन् गावच सोडले

अतुल मेहेरे

Amravati News : देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणुन बहुमान मिळविणाऱ्या प्रतिभाताई पाटील - शेखावत विदर्भातील अमरावतीच्या आहे.त्या राष्ट्रपती झाल्यानंतर एकाएकी राजकारणात सक्रिय झालेले त्यांचे सुपुत्र तथा अमरावतीचे माजी आमदार रावसाहेब शेखावत आता अंबानगरीत दिसेनासे झाले आहेत.रावसाहेब असतात तरी कुठे, करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रतिभा पाटील राष्ट्रपतिपदावर विराजमान झाल्यानंतर त्यांचे सुपुत्र रावसाहेब शेखावत यांना काँग्रेसने एकाएकी अमरावतीच्या राजकारणात सक्रिय केले.त्यासाठी अनेक वर्षे पक्षाचा ‘पंजा’ ईमानेईतबारे धरून चालणारे माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख यांना काँग्रेसने खड्यासारखे बाजुला काढले.डॉ.देशमुख यांना ‘साईड ट्रॅक’ केल्यावर काँग्रेसने रावसाहेब शेखावत यांना अमरावती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. काँग्रेसमधुन दुखावलेले डॉ.सुनिल देशमुख यांनी बंडखोरी करीत रावसाहेब शेखावत यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली.

आता त्यावेळच्या राष्ट्रपती प्रतिभाताईंचेच सुपुत्र आमदार झाले, तर अमरावतीचा पूर्ण ‘मेकओव्हर’च होईल. अमरावती जगाच्या नकाशावर कुठेच्या कुठे निघुन जाईल, या भाबड्या आशेने मतदारांनीही शहरात अनेक वर्ष विकासाची गंगा आणणाऱ्या डॉ. सुनिल देशमुख यांना पराभवाचा चेहरा दाखवित रावसाहेबांना कौल दिला.

रावसाहेब शेखावत आमदार झालेत. बंडामुळे काँग्रेसने (Congress) डॉ. देशमुख यांच्यावर बडगा उगारला. कालांतराने डॉ. सुनिल देशमुख यांनी हाती ‘कमळ’ घेतले. आमदारकीच्या कार्यकाळात रावसाहेब शेखावत यांनी अमरावतीच्या विकासासाठी बरेच काही केले किंवा काहीच केले नाही, यावर राजकीय मतमतांतरे असू शकतात. परंतु रावसाहेब शेखावत यांनी आमदारकीची आपली पाच वर्षांची ‘टर्म’ व्यवस्थित पूर्ण केली.

तिकडे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रतिभाताई पाटील राष्ट्रपतिपदावरून निवृत्त झाल्यात आणि ईकडे त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत रावसाहेब शेखावत यांचा प्रचारात चांगलाच कस लागला. प्रचारासाठी त्यांनी प्रचंड घाम गाळला. पण म्हणतात ना, मतदार खुप हुशार असतो. तो सगळं पाहतो. त्याला सगळं कळतं. तो फक्त बोलत नसतो.

मात्र, मतदानाच्यावेळी योग्य तेच करतो. प्रतिभाताईंचा कार्यकाळ संपलाय, आता रावसाहेबांना निवडून देऊन फायदा होणार नाही, हे लक्षात आल्याने अमरावतीच्या मतदारांनी पुन्हा डॉ. सुनिल देशमुख यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली अन् रावसाहेब शेखावत यांच्या नावापुढे माजी आमदार असे नमूद झाले.

निवडणुकीत पराभव झाल्यानंतर रावसाहेब शेखावत काही दिवसांपर्यंत काँग्रेसमध्ये कार्यरत होते. सभा, बैठक, कार्यक्रम, संमेलन यात त्यांचा सहभाग होता. कार्यकाळ संपल्यानंतर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील (Pratibha Patil)पुण्यात स्थायिक झाल्या होत्या. टप्प्याटप्प्याने राजकारणातून काढता पाय घेत माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी काँग्रेसची सगळी पदं सोडली.

ते राजकीय जबाबदारीतून मुक्त झालेत. कालांतराने माजी आमदार रावसाहेब शेखावत(Raosaheb Shekhavat) राजधानी मुंबईत स्थलांतरीत झालेत. शेखावत यांच्या अमरावतीत शिक्षण संस्था आहेत. माजी आमदार रावसाहेब शेखावत तेथुनच कारभार सांभाळतात, असे सूत्रांनी सांगितले. क्वचितच ते अमरावतीत येतात. मुंबईतही ते राजकारणापासून अलिप्तच आहेत.

प्रतिभा पाटील राष्ट्रपती असतानाच्या काळात अमरावतीत भव्यदिव्य मॉडेल रेल्वे स्टेशन उभे झाले. त्यानंतर अमरावती-मुंबई एक्स्प्रेस रेल्वे सेवा (तेव्हाची अंबा एक्स्प्रेस) सुरू झाली. अमरावती थेट मुंबईशी जोडली गेली. ताईंच्या कार्यकाळात सुरू झालेली अमरावती-मुंबईची ही ‘डायरेक्ट कनेक्टिव्हिटी’ कदाचित माजी रावसाहेब शेखावत यांना भावली असावी व त्यामुळेच त्यांनी मुंबईचा समुद्रकिनारा जवळ केला असावा, अशी चर्चा अमरावतीच्या राजकीय वर्तुळात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT