Ramdas Athawale
Ramdas Athawale Sarkarnama
विदर्भ

Sanjay Raut News : चाळीस जण नाहीत चोर, संजय राऊतांनी करु नये...; आठवलेंनी सोडले 'कवितास्त्र'

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Politics : संजय राऊतांच्या हे विधीमंडळ नसून चोरमंडळ आहे, या वक्तव्यावर सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे आमदार संतप्त झाले आहेत. त्यांनी विधीमंडळात राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. गोंधळामुळे दिवसभरासाठी विधीमंडळाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्याचा शिवसेना-भाजपकडून चांगलाच समचार घेतला जात आहे. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही राऊतांवर निशाणा साधला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली.

ते गोंदिया येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत शिवसेनेतून फुटलेल्या ४० आमदारांना निवडणूक आयोगाच्या निकालानंतर चाळीस चोर म्हणून टीका करतात. त्यानंतर चोरमंडळ या राऊतांच्या विधानावर आठवले यांनी आपल्या स्टाईलमध्ये चारोळी करीत टीका केली.

आठवले म्हणाले, "राज्यात कुणी चोर नाही. जेलमध्ये कोण जाऊन आलेले आहे, हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे विधीमंडळाळा चोर म्हणणे, आमदारांना चाळीस चोर म्हणणे बरोबर नाही." यानंतर त्यांनी शिघ्र कविता केली. ते म्हणाले, "हे ४० आमदार नाहीत चोर, त्यामुळं संजय राऊतांनी करू नये शोर!"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) फुटलेल्या आमदारांचे त्यांनी कौतूक केले. आठवले म्हणाले, "हे चाळीस आमदार हिंमतवाले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आव्हान देऊन शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांनी ठाकरे आणि राऊत यांना शिवसेनेतून बाहेर काढलेले आहे. चाळीसजण शिवसेनेतून बाहेर पडलेले नाहीत."

आठवलेंनी सुप्रीम कोर्टाचा निकालही शिंदेंच्या बाजूने लागणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, "निवडणूक आयोगाचा निकाल शिंदेंच्या बाजूने लागलेला आहे. सुप्रीम कोर्टाचाही निकाल त्यांच्याच बाजूने लागेल, असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे. ठाकरेंना शिवसेनेचे नाव वापरण्याचा अधिकार राहिलेला नाही."

ठाकरेंच्या अवस्थेला तेच जबाबदार असल्याचे सांगून आठवले यांनी राऊत आणि ठाकरे यांच्यावर टीका केली. आठवले म्हणाले, "निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आयुष्यातील फार मोठा धक्का बसला आहे. त्याला ठाकरे आणि राऊतच जाबाबदार आहेत. त्यांनी २०१९ मध्ये भाजपला धोका दिला. भाजपच्या पाठीत खंजीर खुपला. त्यांनी भाजप, आरपीआयसोबत सरकार स्थापन केले असते तर त्यांच्यावर ही नामुष्की आली नसती. त्यांनी मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT