नागपूर : घाटरोड नागपूर आगाराची बस आज सकाळी नांदेडहून पुसदमार्गे नागपूरला येताना उमरखेड पुसद मार्गावरील दहागाव पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेली. यामध्ये किती जण वाहून गेले, किती मरण पावले, याबद्दल दिवसभर वेगवेगळी माहिती सोशल मिडियावर प्रसारित होत राहिली. पण चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सायंकाळी अधिकृतपणे मिळाली. दोघांना वाचविण्यात यश आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या घटनेचा पंचनामा केला. ही घटना आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. बसचे चालक सतीश सुरेवार, वाहक भीमराव नागरीकर, प्रवासी शेख सलीम शे. इब्राहिम (रा. पुसद ), इंदल रामप्रसाद मेहेत्रे (रा. पुसद) या चौघांचा या अपघातात मृत्यू झाला. बसमधील अन्य दोन प्रवासी सुब्रमण्यम सूर्यनारायण शर्मा (रा. आदिलाबाद) व शरद नामदेव फुलमाळे (रा. काटोल, ता. पुसद) या दोघांना धाडसी युवकांनी पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.
नांदेडवरून नागपूरला जाणारी हिरकणी बस (क्र. एमएच १४ बीटी ५०१८) उमरखेड बसस्थानकातून सकाळी सात वाजून ४० मिनिटांनी चार प्रवाशांना घेऊन निघाली. शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या दहागाव नाल्यावर पुलावरून पाणी जात होते. यावेळी पुलावरून बस निघून जाईल, या आत्मविश्वासातून चालकाने बस पुलावर टाकली. पुलावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे बस नाल्याच्या दिशेने वळून वाहून जाऊ लागली. पुलापासून पन्नास ते साठ फूट अंतरावर असलेल्या झाडाला ती अडकली.
ही घटना घडत असताना अनेक नागरिक घटनास्थळी उपस्थित होते. एक प्रवासी झाडावर व एक बसजवळ स्वतःला वाचवत उभे होते. बस नाल्यात वाहून जात असताना तिथे उभ्या असलेल्या धाडसी युवकांनी नाल्याच्या पाण्यामध्ये जाऊन दोघांचे प्राण वाचवले. तर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. आणखी दोघांचा तर उर्वरित मृतदेह बसमध्ये अडकून पडले आहे. क्रेनच्या साहाय्याने बस काढण्याचे प्रयत्न बचाव पथकाने सुरू केले. मात्र, क्रेनची केबल तुटल्याने बस काढण्यात अडचण निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच प्रशासन पोहोचण्यापूर्वी महागाव तालुक्यातील वाकद येथील अविनाश राठोड या युवकाने एकाचे प्राण वाचविले. तर दुसऱ्याला मारोती चिंचे, पांडुरंग शिंदे, नगरसेवक संदीप ठाकरे यांनी वाचविले. घटनेची गंभीरता पाहता आमदार नामदेव ससाणे, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार आनंद देऊळगावकर, ठाणेदार अमोल माळवे आदी अधिकारी
कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी ठाण मांडून होते. खासदार हेमंत पाटील व अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांनी घटनास्थळी भेट दिली.
आमदार उतरले पुराच्या पाण्यात
पुरात बस वाहून गेल्याची माहिती मिळताच घटनास्थळी आमदार नामदेव ससाणे दाखल झालेत. त्यांनी पाण्यातून दोन प्रवाशांना बाहेर काढून प्राण वाचविणाऱ्या युवकांची पाठ थोपटली. बसमध्ये अजून काही जण अडकून असल्याचे समजताच ते त्या युवकासमवेत पुराच्या पाण्यात उतरले. त्यानंतर बसमधील एकाला बाहेर काढण्यास मदत केली.
दहागाव नाल्यावरील पुलाला कठडे नसल्याने पुराचा अंदाज चालकाला येऊ शकला नाही. घडलेली घटना अत्यंत दुदैवी आहे. या घटनेची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळविली आहे.
- हेमंत पाटील, खासदार.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.