हिंगोली : शिवसेनेच्या हेमंत पाटील यांच्या विजयात उमरखेड मतदारसंघ राहिला निर्णायक

हिंगोली लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. मराठवाडा व विदर्भाच्या संमिश्र संस्कृतीत असलेल्या या मतदारसंघाची राजकीय पार्श्‍वभूमीही तेवढीच संमिश्र आहे. या मतदारसंघात हिंगोलीचा खासदार निवडण्याची शक्ती असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही उमरखेड विधानसभा मतदारसंघ हा निर्णायक राहिला असून शिवसेनेच्या हेमंत पाटील यांना तब्बल पन्नास हजारांवर मतांची लीड मिळवून दिली आहे.
हिंगोली : शिवसेनेच्या हेमंत पाटील यांच्या विजयात उमरखेड मतदारसंघ राहिला निर्णायक

महागाव : हिंगोली लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. मराठवाडा व विदर्भाच्या संमिश्र संस्कृतीत असलेल्या या मतदारसंघाची राजकीय पार्श्‍वभूमीही तेवढीच संमिश्र आहे. या मतदारसंघात हिंगोलीचा खासदार निवडण्याची शक्ती असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही उमरखेड विधानसभा मतदारसंघ हा निर्णायक राहिला असून शिवसेनेच्या हेमंत पाटील यांना तब्बल पन्नास हजारांवर मतांची लीड मिळवून दिली आहे.

यावेळी हिंगोली लोकसभेची निवडणूक सेना-भाजप युतीचे हेमंत पाटील व काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे सुभाष वानखडे यांच्यातच थेट लढल्या गेली. मात्र, वंचित बहुजन विकास आघाडी व गोरबंजारा समाजाच्या उमेदवारांनी काँग्रेसची मते कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे उमरखेड मतदारसंघातून सेनेच्या हेमंत पाटील यांना 56,391 इतक्या विक्रमी मतांची लीड मिळाली. 

हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमरखेड, किनवट, हातगाव, वसमत, कळमनूरी व हिंगोली या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्या सर्वच मतदारसंघातून सेनेला मताधिक्य मिळाले आहे. युतीचे उमेदवार हेमंत पाटील यांना 5,86,312 एवढी मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी महाआघाडीचे उमेदवार सुभाष वानखडे यांना 3,08,456 मते पडली. 2 लाख 77 हजार 856 एवढ्या घवघवीत मतांनी सेनेचे उमेदवार हेमंत पाटील विजयी झाले. त्यात उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा आहे. या एकाच मतदारसंघाने 56 हजार 391 मतांची लीड दिली आहे. त्यांच्या विजयामागील कारणांचा विचार केला असता या मतदारसंघात भाजप व सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्याचे दिसून येते. त्यांना दोन माजी व एका आजी आमदारांचे नेतृत्व लाभले. 

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत एकत्र असल्याचे चित्र मात्र पाहायला मिळाले नाही. माजी आमदार उत्तमराव इंगळे व माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर आणि विद्यमान आमदार राजेंद्र नजरधने या तिघांनीही कार्यकर्त्यांसह विजयासाठी परिश्रम घेतले. शिवसेनेसह भाजप कार्यकर्त्यांनी ’डोअर टू डोअर’ प्रचार केला. वंचित बहुजन आघाडीला मिळणारी मते ही काँग्रेसची परंपरागत मते आहेत. वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड यांनी या मतदारसंघातून 22 हजार 223 मते घेतली. तर गोर बंजारा समाजाचे उमेदवार संदेश राठोड यांनी 5,397 मते मिळविली. यामुळे काँग्रेसचे मताधिक्य घटले. परंतु, त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला असे म्हणता येत नाही. 

उमरखेड विधानसभेतील बंजारा समाज शिवसेनेच्या बाजूने राहिला. ते काँग्रेसचे पारंपरिक मतदान होते. यावेळी मात्र ते भाजपला गेले. उत्तमराव इंगळे आदिवासी समाजाचे असल्याने त्यांच्या समाजाची मतेही भाजपला गेली. तर प्रकाश पाटील देवसरकर यांच्यामुळे मराठा समाजाची मते भाजपकडे राहिली. त्यांना विद्यमान आमदारांची साथ मिळाली. तर, काँग्रेसचे सुभाष वानखडे यांना वेळेवर उमेदवारी जाहीर झाल्याने व दोन पक्ष फिरून आलेला उमेदवार ऐनवेळी दिल्याने पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी होती. 

माजी खासदार राजीव सातव व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची खेळी येथे चालली नाही. मुस्लिम व दलित समाजाची काँग्रेसची पारंपरिक मते वंचित आघाडीकडे गेली. सुभाष वानखडे यांनी 2014 मध्ये सेनेकडून निवडणूक लढविली होती. त्यांच्याबाबत नाराजीचा सूर होता. तो परिणाम यावेळी दिसून आला. माजी आमदार विजय खडसे यांनी काँग्रेसचे निष्ठेने काम केले. 

2014 मध्ये आमदारकीच्या निवडणुकीत राजेंद्र नजरधने यांना 50 हजारांवर लीड होती. तीच लीड यावेळी लोकसभेत कायम राहिली. त्यामुळे नजरधने यांना पुढील नियोजन सोपे झाले आहे. काँग्रेसमध्ये नियोजनाचा अभाव होता. ते कार्यकर्त्यांपर्यंतही पोहोचू शकले नाहीत. काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाल्याने माजी आमदार विजय खडसे यांच्या उमेदवारीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. तर सेनेच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याने भाजपचे आमदार राजेंद्र नजरधने यांना संजीवनी मिळाली आहे. काँग्रेसचे नेते महागाव तालुक्यातील शिवाजीराव सवने व दत्तराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्य राम देवसरकर व शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, त्यांना राष्ट्रवादीची साथ अखेरपर्यंत मिळाली नाही. शिवसेना भाजपचे मावळे मात्र एकदिलाने लढले आणि ते जिंकलेही.

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार हेमंत पाटील यांना उमरखेड विधानसभेतून 50 हजारांवर मताधिक्य देण्यात भाजपचे विद्यमान आमदार राजेंद्र नजरधने यांना यश मिळाले. त्यामुळे त्यांच्याबद्दल असलेली नाराजी दूर झाली असून त्यांना एकप्रकारे संजीवनीच मिळाली आहे. तर मोठ्या मतांच्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखडे पराभूत झाल्याने माजी आमदार विजय खडसे यांच्या उमेदवारीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

उमरखेड विधानसभा मतदारसंघाच्या संघटन बांधणीची जबाबदारी सेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांच्याकडे आहे. त्यांनी गेल्या वर्षभरात उमरखेड व महागाव तालुक्यात विविध कार्यक्रम घेतले. शिवाय, डॉ. विश्‍वनाथ विनकरे यांनी अगदी बंदीभागात जाऊन सुद्धा वैद्यकीय शिबिरे घेतली. त्यामुळे या मतदारसंघात सेनेची संघटनात्मक बांधणी चांगल्याप्रकारे झाली. त्याचाही फायदा लोकसभा निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराला मिळाला. त्यामुळे हा मतदारसंघ सेनेला सोडावा, अशी मागणी होण्याची शक्यता आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com