Gadchiroli Doctors Resignation Sarkarnama
विदर्भ

Gadchiroli Doctors Resignation : CM फडणवीसांच्या पालकत्व जिल्ह्यात एकाचवेळी सहा डॉक्टरांचे राजीनामे; गडचिरोलीत आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा?

Six contractual doctors resign together from Gadchiroli Aheri Women and Child Hospital, raising serious concerns over Maharashtra rural healthcare System : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीच्या महिला व बाल रुग्णालयातील पाच डॉक्टरांनी एकावेळी सामूहिक राजीनामे दिले असून, वेगवेगळी कारणे सांगितले जात आहेत.

Pradeep Pendhare

Gadchiroli News : राज्यातील दुर्गम आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, या जिल्ह्याचे पालकत्व स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना आणि भाजप महायुती सरकारकडून आरोग्य सुविधा सुधारल्याचे दावे सातत्याने केले जात असताना धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील अहेरी येथील अत्याधुनिक महिला व बाल रुग्णालयातील तब्बल सहा कंत्राटी डॉक्टरांनी (Doctor) एकाचवेळी सामूहिक राजीनामे दिल्याची माहिती समोर आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण होऊन सेवा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अहेरी येथील 100 खाटांचे ‘महिला व बाल रुग्णालय’ हे तब्बल 83 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले अत्याधुनिक आरोग्य केंद्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते 8 नोव्हेंबर 2025 रोजी या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. दुर्गम भागातील माता आणि नवजात बालकांना 24 तास प्रसूती व उपचार सेवा देण्यासाठी हे रुग्णालय सुरू करण्यात आले होते.

मात्र उद्घाटनानंतर अवघ्या काही महिन्यांतच या रुग्णालयाला मोठा धक्का बसला आहे. एकाचवेळी सहा कंत्राटी डॉक्टरांनी राजीनामे दिल्यामुळे आरोग्य विभागाच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या राजीनाम्यांमागील अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र ऑगस्ट 2026 मध्ये होणाऱ्या NEET-PG परीक्षेच्या तयारीसाठी संबंधित डॉक्टरांनी पद सोडल्याची चर्चा सुरू आहे. मात्र प्रशासनातील कोणताही अधिकारी या कारणाला अधिकृत दुजोरा देण्यास तयार नाही.

दरम्यान, रुग्णालय सुरू करताना महिला व बालकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. पण रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यापूर्वीच डॉक्टरांनी पदे सोडल्याने सरकारी आरोग्य व्यवस्थेतील अंतर्गत समस्यांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

रिक्त पद तातडीने भरा

प्रशासकीय ताण, अपुऱ्या सुविधा, मनुष्यबळाचा अभाव किंवा अन्य अंतर्गत कारणांमुळे डॉक्टरांनी हा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून रिक्त पदांवर तातडीने नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरत आहे.

वैद्यकीय सेवा कोलमडण्याची भीती

अहेरीसह भामरागड, एटापल्ली आणि सिरोंचा या दुर्गम भागातील हजारो महिला व बालकांसाठी हे रुग्णालय जीवनदायी केंद्र मानले जाते. मात्र डॉक्टरांच्या अचानक राजीनाम्यांमुळे नागरिकांना पुन्हा जिल्हा मुख्यालय किंवा खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रुग्णालयात 16 पदे मंजूर

रुग्णालयासाठी वैद्यकीय अधिकारी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची एकूण 16 पदे मंजूर आहेत. त्यापैकी फक्त 7 पदे भरलेली असून तब्बल 9 पदे अद्याप रिक्त आहेत. सध्या केवळ एक नियमित बालरोगतज्ज्ञ आणि सहा कंत्राटी वैद्यकीय अधिकारी सेवा देत आहेत. त्यातील सहा जणांनी नियमानुसार पूर्वसूचना देत राजीनामे सादर केले असून ते 30 जून ते 10 जुलै दरम्यान कार्यमुक्त होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

विरोधकांना सरकारला घेरण्याची संधी

सरकार आरोग्य व्यवस्थेच्या सुधारणांचे दावे करत असताना मुख्यमंत्री फडणवीसांच्या देखरेखीतील जिल्ह्यातच, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने विरोधकांना सरकारला घेरण्याची मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT