

Maharashtra Political News : राज्यातील राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी पक्षाला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता ‘ऑपरेशन टायगर 3.0’ची चर्चा राज्यभर रंगली आहे.
मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी, प्रकल्पाचे कारण देत विरोधक खासदार-आमदार सत्ताधारी पक्षात सहभागी होत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील आमदार-खासदारांना विकासकामांसाठी निधी मिळतो का? या प्रश्नावर खासदार नीलेश लंके यांनी मोठं आणि खळबळजनक विधान करत थेट सत्ताधारी आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांसंदर्भातील बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी विकासनिधीच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, खासदारांना मिळणारा निधी हा विकासकामांसाठी असतो. मात्र तो अत्यंत मर्यादित असतो. पाच कोटी रुपयांचा निधी मिळतो. पण आठ तालुक्यांमध्ये हा निधी वाटायचा झाल्यास सर्वांना समाधान देता येत नाही. त्यामुळे अनेकदा एक-दोन वर्षांचा निधी एकत्र करून 15 ते 16 कोटी रुपयांची कामे केली जातात, असे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर (Social Media) फिरणाऱ्या त्यांच्या विकासनिधीच्या आकडेवारीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. माझ्या निधीबाबत जी माहिती समाज माध्यमांवर फिरत आहे ती चुकीची आहे. मी काम करणारा कार्यकर्ता आहे, निधी खर्च करण्यापेक्षा विकासकामे प्रत्यक्ष पूर्ण करण्यावर माझा भर असतो, असे खासदार लंके यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षातील खासदारांना काम करताना अडचणी येतात का? या प्रश्नावर त्यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. विरोधी पक्षात राहून काम करताना किती अडथळे येतात हे संपूर्ण देशाला माहिती आहे. निधी मिळत नाही, विकासकामे मंजूर होत नाहीत आणि प्रशासनाकडूनही सहकार्य मिळत नाही, असा आरोप त्यांनी केला.
या वेळी त्यांनी प्रशासनावर राजकीय दबाव आणला जात असल्याचाही गंभीर आरोप केला. लंके म्हणाले, “आमच्यासारखे लोक जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी जातो, तेव्हा तिथे सत्ताधाऱ्यांचे बगलबच्चे आधीपासूनच फिरत असतात. आम्ही बाहेर पडलो की ते लगेच अधिकाऱ्यांना भेटतात आणि विचारतात की कोणत्या कामासाठी आले होते. त्यानंतर संबंधित कामे थांबवण्याचा प्रयत्न केला जातो.”
इतक्यावरच न थांबता त्यांनी काही लोकांवर पोलिस यंत्रणेचा गैरवापर केल्याचाही आरोप केला. काहींनी पोलिसांना हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करण्याचा उद्योग सुरू केला आहे. हा त्यांचा धंदा आहे. पण आम्ही अशा दबावतंत्राला भीक घालणारे नाही, असा जोरदार टोला त्यांनी लगावला.
राज्यात सुरू असलेल्या पक्षफोडीच्या चर्चांदरम्यान नीलेश लंके यांनी केलेल्या या विधानामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सत्ताधारी विरुद्ध विरोधक संघर्ष तापण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांबाबतही फुटीच्या चर्चा सुरू असताना हे वक्तव्य राजकीयदृष्ट्या अधिक महत्त्वाचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.