Sanjay Meena IAS Gadchiroli. Google
विदर्भ

Gadchiroli : धान घोटाळ्यात जिल्हाधिकाऱ्यांची 'या' भातगिरणी मालकांवर कारवाई?

Collectors Action : पाऊणेतीन कोटी रुपयांचा ठोठावला दंड; यापूर्वी एकाला केले होते निलंबित

संदीप रायपूरे

Step of Administration : भरडाईसाठी उचल केलेल्या धान्याची जिल्ह्याबाहेर विक्री करून त्याऐवजी नित्कृष्ट दर्जाचा तांदूळ शासकीय गोदामात जमा करणाऱ्या भातगिरणी मालकांवर गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी संजय मिना यांनी कडक पाऊल उचलल्याने भातगिरणी मालकांचे धाबे दणाणले आहे.

पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे चार जिल्हे धान उत्पादनात अव्वल आहेत. या जिल्ह्यांत धानाच्या विविध प्रजाती आहेत. अनेक प्रजातींना मोठी मागणी आहे. चारपैकी काही जिल्ह्यांत ठोकळ धानाचेही उत्पन्न घेतले जाते. ठोकळ धान बारीक करून अवाजवी किमतीत विकण्याचा गोरखधंदा सध्या या भागात सुरू आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील असा प्रकार करणाऱ्या 41 भातगिरणी मालकांविरोधात जिल्हाधिकारी संजय मिना यांनी कारवाई केलीय. या मिल मालकांना तब्बल 2 कोटी 67 लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. पूर्व विदर्भात झालेल्या या कारवाईमुळे भातगिरणी मालकांचे धाबे दणाणले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील आधारभूत खरेदी योजनेत गैरव्यवहार केल्याचा ठपका या भातगिरणी मालकांवर ठेवण्यात आला आहे. नाशिकच्या आदिवासी विकास संचालकांनी याबाबत कठोर भूमिका घेतली. त्यानंतर चौकशी करून कारवाईचे आदेश देण्यात आले होते.

या प्रकरणात गडचिरोलीमधील आदिवासी विकास महामंडळाच्या तत्कालीन व्यवस्थापकाला निलंबित करण्यात आले होते. या घडामोडींनंतर जिल्हाधिकारी मिना यांनी भातगिरणी मालकांना नोटीस बजावली होतील. त्यातून स्पष्टीकरण मागण्यात आले होते. पण भातगिरणी मालकांनी दिलेले स्पष्टीकरण असमाधानकारक होते. कुठलेही ठोस पुरावे त्यासोबत नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी मिना यांनी 41 भातगिरणी मालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अनेक दिवसांपासून गडचिरोलीत धान घोटाळा गाजत होता. आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत भरडाईसाठी उचल केलेल्या धानाची जिल्ह्याबाहेर परस्पर विक्री करणे, आणि त्याऐवजी बाजारातून निकृष्ट दर्जाचा तांदूळ खरेदी करुन शासकीय गोदामात जमा करणे, अशा प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका या गिरणी मालकांवर ठेवण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील या 41 भातगिरणी मालकांनी संगनमत करुन गंभीर अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार केल्याची बाब नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे सर्व मिल मालकांच्या दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली होती. शासकीय पातळीवरही हा धान घोटाळा चांगलाच गाजला होता.

भातगिरणींवर झाली होती चर्चा

पूर्व विदर्भातील अनेक भातगिरणी अलीकडच्या काळात बंद झाल्या होत्या. त्यावर नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत प्रदीर्घ चर्चाही झाली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनील मेंढे, खासदार अशोक नेते, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीला उपस्थित होते. एकीकडे शासकीय स्तरावर भातगिरणी उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न सुरू असतानाच गडचिरोली प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे मिल मालकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT