Sanjay Pandilwar join BJP
Sanjay Pandilwar join BJP Sarkarnama
विदर्भ

Vidarbha News : विदर्भात बावनकुळेंचा काँग्रेसला दे धक्का : गडचिरोलीतील वरिष्ठ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

सरकारनामा ब्यूरो

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी गडचिरोलीत (Gadchiroli) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का दिला आहे. महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष रूपाली पंदिलवार यांचे पती काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय पंदिलवार (Sanjay Pandilwar) यांनी बावनुकळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या धामधुमीत पंदिलवार यांनी पक्ष सोडणे काँग्रेससाठी धक्कादायक मानले जात आहे. (Gadchiroli District Congress General Secretary Sanjay Pandilwar joins BJP)

विदर्भात सध्या नागपूर शिक्षक मतदारसंघाची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवारी (ता. २८ जानेवारी) गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा सरचिटणीस संजय पंदिलवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बावनकुळे यांनी पक्षात स्वागत केले आहे. पंदिलवार यांच्या भाजप प्रवेशाने गडचिरोलीत एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, संजय पंदिलवार हे स्वतः काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस होते, तर त्यांच्या पत्नी रूपाली या गडचिरोली महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे पंदिलवार यांच्या भाजप प्रवेशाची एकच चर्चा सुरू आहे. पतीने भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी आपण काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून आपण काँग्रेसमध्ये कायम राहणार असल्याचे रुपाली पंदिलवार यांनी स्पष्ट केले.

पतीच्या भाजप प्रवेशाबाबत रुपाली पंदिलवार म्हणाल्या की, संजय पंदिलवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांचे मन वळवून मी त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये पुन्हा घेऊन येणार आहे. ते जरी शरिराने भाजपमध्ये गेले असले तरी ते मनाने अद्यापही काँग्रेसचेच आहेत, त्यामुळे ते पुन्हा काँग्रेस पक्षात येतील, असा मला विश्वास आहे.

पंदिलवार यांच्या भाजप प्रवेशावेळी खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, आमदार देवराव होळी, माजी आमदार अंबरिशराव आत्राम, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, रवींद्र ओलालवार, प्रमोद पिपरे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT