Congress functionaries have directly reached the Delhi : अद्याप लोकसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली, तरी निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भाजप तिकडे जोमात कामाला लागली असली, तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गडचिरोली-लोकसभेवरून जुंपल्याचे दिसत आहे. (They are making excuses for their own party to contest this Lok Sabha)
दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे ही लोकसभा आपल्याच पक्षाने लढवावी म्हणून साकडे घालत आहेत. आतापर्यंत राज्यातील पक्षश्रेष्ठीची मनधरणी करणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी थेट दिल्ली दरबार गाठला आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा पंजा राष्ट्रवादीच्या घड्याळाचा काटा काढणार की, हा काटाच पंजात घुसून त्याला घायाळ करणार, हे लवकरच कळणार आहे.
सध्या लोकसभा निवडणूक नऊ-१० महिन्यांवर येऊन ठेपली. पण या निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. यात आपली नौका बुडू नये, म्हणून प्रत्येकच पक्ष राजकीय वाऱ्यांची दिशा पाहून आपले शेड उभारत आहेत. महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला एकाच नौकेत स्वार व्हायचे आहे. ती नौका म्हणजे गडचिरोली-चिमूर लोकसभा होय.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने अतिशय मोठे असून तीन जिल्ह्यांत पसरलेले आहे. त्यात गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र येणाऱ्या लोकसभेत ही जागा महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात यावी, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत आहे.
वर्तमान परिस्थितीचा विचार करता स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगर परिषद, बाजार समित्यांमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा अधिक आहे. अहेरी विधानसभा क्षेत्र वगळता इतर कुठल्याही विधानसभेत राष्ट्रवादीचे अस्तित्व नाही. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून या लोकसभा क्षेत्राची मागणी होत आहे. हे चुकीचे असून स्थानिक राजकीय परिस्थितीचा विचार करता काँग्रेस पक्ष अधिक वरचढ ठरतो, असे सांगत ही जागा काँग्रेस कोट्यातच राहावी, असा आग्रह गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी दिल्ली दरबारी पक्षश्रेष्ठींकडे लावून धरला आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्यावतीने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही व लवकरच राष्ट्रीय स्तरावरून नेते मंडळी लोकसभेतील तालुकानिहाय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन निवडणुकीची तयारी करणार असल्याची माहिती दिली आहे. सोबतच गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभादेखील काँग्रेसच लढविणार असल्याचे आश्वासनही पक्षश्रेष्ठींनी दिल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
या दिल्ली वारीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, पवनकुमार बन्सल, अविनाश पांडे, के. राजू, माणिक टागोर, आशिष दुवा, शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरेंसह इतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेते मंडळीची भेट काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली.
यावेळी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार मारोतराव कोवासे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार पेंटा रामा तलांडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजित कोवासे आदींची उपस्थिती होती.
आता कसे टीक टीक करणार?
खरेतर सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा लढविण्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या गडचिरोली दौऱ्यादरम्यान देसाईगंज येथील पक्ष मेळाव्यात धर्मरावबाबांना लोकसभेच्या तयारीची जाहीर सूचना केली होती. पण लोकसभेच्या चर्चा सुरू होताच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभेवर आपला दावा सांगायला सुरूवात केली.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची भेट घेऊन ही लोकसभा काँग्रेसच (Congress) लढविणार, असे जाहीर केले. मग राष्ट्रवादी काँग्रेसने थेट शरद पवारांची भेट घेत ही लोकसभा आपणच लढविणार असे सांगितले. त्यावर काँग्रेसचे पदाधिकारी थेट दिल्ली दरबारी पोहोचले. आता पंजाच्या पकडीतून ही लोकसभा सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) घड्याळ कसे टीक टीक करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातही सर्वांत मोठी गंमत म्हणजे मागील नऊ वर्षांपासून ही लोकसभा भाजपने आपल्या कब्जात ठेवली आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.