Gadchiroli BJP District President Change News : देशातली सर्वांत मोठा व मागील नऊ वर्षांपासून सत्तेस असलेल्या भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची धुरा सांभाळण्यासाठी नव्या जिल्हाध्यक्षाचा शोध सुरू केला आहे. या पदासाठी ‘एक अनार सौ, बिमार’ म्हणीप्रमाणे अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. (BJP wants a comprehensive face for the post of District President)
जिल्हाध्यक्ष पदासाठी भाजपला सर्वसमावेशक चेहरा हवा आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या गडचिरोलीवर आता भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एक खासदार, दोन आमदार तसेच सहकारासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचा प्रभाव आहे. आगामी काळातही पक्षाची ताकद वाढावी, यासाठी श्रेष्ठींचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य कार्यकारिणीतही येथील पदाधिकाऱ्यांना संधी दिली गेली आहे.
विद्यमान जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नवीन जिल्हाध्यक्षांची निवड करण्याच्या तयारीला वेग आला आहे. सहकार क्षेत्रातील मोठे नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांना जिल्हाध्यक्षपदासाठी विचारणा झाली, परंतु त्यांनी नकार दिल्याचे कळते. आता जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे, गोविंद सारडा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांची नावे चर्चेत आहेत.
पक्षात या सर्वांकडे सध्या जिल्हा महामंत्रिपद आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून यांपैकी कोणाची वर्णी लागते, याबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. विद्यमान जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांनी आत्तापर्यंत तीन वेळा जिल्हाध्यक्षपद भूषविले. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळेल का, हा प्रश्नच आहे. शिवाय विद्यमान खासदार अशोक नेते यांनीही जिल्हाध्यक्ष पद भूषविले आहे.
जिल्हाध्यक्ष पदाचा विचार केल्यास भाजपची जिल्ह्यात सुरुवात झाली तेव्हापासून सोबत असलेले प्रमोद पिपरे यांच्या नावाला पसंती मिळू शकते. याशिवाय पक्षाचे युवा नेते प्रशांत वाघरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. १५ दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे गडचिरोलीत आले होते. यावेळी त्यांनी सर्किट हाउसमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
सध्या जिल्हाध्यक्षपदाच्या स्पर्धेत असलेले प्रशांत वाघरे हे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर व खासदार अशोक नेते यांचे निकटवर्तीय आहेत. गोविंद सारडा हे प्रतिष्ठित पदाधिकारी असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झाले आहेत. शिवाय रवींद्र ओल्लालवार यांच्यावरही पक्षश्रेष्ठींची मर्जी आहे. याशिवाय इतरही काही नावे चर्चेत आहेत.
ओबीसी चेहरा का नाही ?
गडचिरोली (Gadchiroli) जिल्हा आदिवासीबहुल आहे. पण आदिवासीनंतर या जिल्ह्यात सर्वाधिक संख्या ओबीसींची आहे. हा समाज येथील राजकारणातही (Politics) प्रभावी आहे. हीच बाब हेरून काँग्रेसने महेंद्र ब्राह्मणवाडे यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. भाजपही अशाच ओबीसी चेहऱ्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. पण यापूर्वी भाजपने किसन नागदेवे यांना तीनदा हे पद बहाल केले आहे. खासदार असलेले अशोक नेते यांनासुद्धा जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले आहे.
खरेतर भाजपला मोठे करण्यात पक्षातील ओबीसी (OBC) नेत्यांनी अगदी प्रारंभापासूनच प्रचंड परिश्रम घेतले आहे. पण ओबीसींना पद देताना हात आखडता घेतला जातो, अशी खंत काही ओबीसी नेते खासगीत व्यक्त करतात. पक्षाला जिल्हाध्यक्षाच्या रूपात ओबीसी चेहरा मिळावा, अशी पक्षातील केवळ ओबीसीच नाही तर इतरांचीही इच्छा आहे. प्रमोद पिपरे, प्रशांत वाघरे यांच्यासारखे चांगले पर्याय असताना ओबीसी चेहरा का नाही, असा प्रश्नही विचारला जात आहे.
सध्या भाजपचे (BJP) बव्हंशी नेते, पदाधिकारी जिल्हाध्यक्ष पदाबद्दल गुप्तता पाळून आहेत. चर्चेतील नावे केवळ अफवा असल्याचेही बोलायला ते मागे पुढे पाहात नाहीत. आमच्या पक्षाची निवड प्रक्रिया वेगळी असते. मुलाखत घेणे, सर्वांची मते घेणे वगैरे सोपस्कार करावे लागतात, असे ते सांगतात. पण ‘तुम्हाला पक्षाने जिल्हाध्यक्ष व्हा, म्हटले तर काय करणार’ या प्रश्नावर ते गोड हसून ‘पक्षाने जबाबदारी दिली तर स्वीकारावीच लागेल’ असेही सांगतात. त्यामुळे या पदाची इच्छा अनेकांची आहे आणि या पदाचे नाव घेतले तरी 'मन मे लड्डू फुटा' अशी अनेकांची स्थिती आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.