Devrao Holi and Mahendra Brahmanwade Sarkarnama
विदर्भ

Gadchiroli MLA News : आमदार साहेब, हिरापूरला बक्षीस केव्हा देणार म्हणत ब्राह्मणवाडेंचा होळींवर निशाणा !

Congress Leaders : भाजपचे आमदार कसे नागरिकांना फसवितात, हे काँग्रेसचे नेते सांगत आहेत.

संदीप रायपूरे

Gadchiroli MLA News : गडचिरोली विधानसभा मतदारसंघाच्या ज्या गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध होतील. त्या गावांना आपण विशेष बक्षीस देणार. गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरभरून निधी देऊ, असे आश्वासन गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव होळी यांनी दिले होते. पण ते आश्‍वासन आमदार महोदयांनी न पाळल्यामुळे ते काँग्रेस नेत्यांच्या निशाण्यावर आले आहे.

विधानसभा मतदारसंघातील हिरापूर या गावात गावकरी एकत्र आले. त्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध केली, पण आमदार होळींनी त्यांना ना बक्षीस दिले, ना विकासाकरिता निधी. चार वर्षे लोटले, आता तर आमदार गावातही येत नाहीत. भाजपचे आमदार कसे नागरिकांना फसवितात, हे आता काँग्रेसचे नेते सांगत आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी या मुद्द्यावरून आमदार होळीवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

लोकसभा निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे आता भाजप, काँग्रेसचे नेते अलर्ट झोनमध्ये आहेत. आपले मुद्दे पटवून देण्यासाठी ते गावागावांत जात आहेत. गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा मतदारसंघात भाजपचीच सत्ता आहे. खासदार व आमदार निवडून आणण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व भाजपचे आमदार देवराव होळी करतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार होळी यांचे मतदारसंघातील कामांकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी हिरापूर गावाचा संदर्भ देत होळींवर निशाणा साधला आहे. ब्राह्मणवाडे यांनी काल हिरापूर गावात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी गावातील नागरिकांनी आपल्यावर आमदार होळींनी कसा अन्याय केला, याचा पाढाच वाचून दाखविला.

या वेळी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला. भाजपने देशातील तरुणांच्या आशेवर पाणी फिरवण्याचे काम केले आहे. दोन कोटी रोजगार देण्याची गॅरंटी त्यांनी दिली. पण प्रत्यक्षात मात्र नोकरी देण्याऐवजी नोकरकपात करून तरुणांचा रोजगार हिसकावण्याचे पाप त्यांनी केले. खोटं बोला, पण रेटून बोला ही भाजपची नीती आहे. आता त्यांची ही फसवी नीती लोकांच्या लक्षात आली आहे. हिरापूरसारख्या गावातील नागरिकांना भूलथापा देणाऱ्या आमदार होळींबाबत आता लोकच काय ते ठरवतील, असे ब्राह्मणवाडे म्हणाले.

युवक काँग्रेसचे नेते अतुल मल्लेलवार, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, हिरापूरच्या सरपंच शालिनी कुमरे ब्राह्मणवाडे यांच्यासोबत हिरापूरमध्ये होते. येणाऱ्या दिवसांत लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. यासाठी भाजपसह काँग्रेसने कंबर कसली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे या वेळी गडचिरोलीकडे विशेष लक्ष आहे. अशात आता गावातील नागरिक भाजपच्या आमदारांची पोलखोल करून त्यांची चांगलीच पंचाईत करीत असल्याचे चित्र आहे.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT