Banner Of Gadchiroli District Sarkarnama
विदर्भ

Gadchiroli Nitish Kumar News : महाराष्ट्र सरकारला लाजवतोय गडचिरोलीतील नितीश कुमारांच्या अभिनंदनाचा फलक !

Bihar Government : बिहार सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

संदीप रायपूरे

Gadchiroli District Political News : महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना व्हावी, याकरिता ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आहेत, पण महाराष्ट्र सरकार यावर चकार शब्दही काढायला तयार नाही. तिकडे बिहार सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तो प्रत्यक्ष अमलात आणला आणि जातीनिहाय आकडेवारी जाहीरही केली. (The Bihar government took a bold decision to conduct a caste-wise census)

देशात कुणालाच जमलं नाही, ते नितीश कुमार व तेजस्वी यादव सरकारने करून दाखविले. त्यामुळे देशभरात ओबीसींकडून त्यांचे स्वागत होत आहे, कौतुक केले जात आहे. राज्याच्या सीमेवरील आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वडसा येथे बिहार सरकारच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत. याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.

देशात गेल्या अनेक वर्षांपासून जातीनिहाय जनगणना व्हावी, यासाठी ओबीसींच्या विविध संघटनांकडून सातत्याने मागणी होत आहे. वारंवार मागणी करूनही सत्ताधाऱ्यांनी ओबीसींकडे पुरते दुर्लक्ष केले. गावागावांत, शहरांतून ही मागणी आता जोर धरू लागली आहे. जनगणना झाली की ओबीसी समाजाची आकडेवारी समोर येणार अन् त्यानुसार ‘जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी’, हा मुद्दा समोर येणार आहे.

सरकारला ओबीसींची जातीनिहाय जनगणना करायचीच नाही, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बिहार सरकारने जातीनिहाय जनगणना केली व तो आकडा सर्वांसमोर मांडला. यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. आता मात्र कुठल्याही परिस्थितीत ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, ही मागणी आता राज्यभर रेटून धरली जात आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने महामोर्चा नुकताच काढण्यात आला होता. यात लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.

जनगणनेची मागणी समोर आली की, सरकार पद्धतशीरपणे त्याकडे दुर्लक्ष करून या मुद्द्याला बगल देते. यांनी आमच्या हातात ‘सत्ता द्या, मी ओबीसी आरक्षण मिळवून देतो’, अशी हमी देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. सत्ता आली, ते उपमुख्यमंत्री झाले; पण आपलं आश्वासन विसरले. राज्य सरकार ओबीसींची जातीनिहाय जनगणना करत नाही. त्यामुळे ओबीसींत प्रचंड संताप आहे.

अशावेळी बिहार सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करून आकडेवारीही समोर आणली. याचा प्रचंड आनंद महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांत आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या अभिनंदनाचे फलक महाराष्ट्र सरकारला लाजविणारे ठरले आहेत. सध्या जिल्हाभर याच बॅनरची चर्चा आहे.

या बॅनरमधून ओबीसींना प्रेरणा मिळाली आहे. आता ते जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी पुन्हा आपला आवाज बुलंद करणार आहेत. राज्यात विदर्भात ओबीसींची संख्या लक्षणीय आहे. ओबीसींची जनगणना झाल्यास संख्येनुसार आरक्षण देणे भाग पडेल, ही भीती सत्ताधाऱ्यांना आहे. त्यामुळे सरकार या मागणीकडे पुरते दुर्लक्ष करीत आहेत.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT