Chandrapur District's Aksapur Rojgar Sevak News : गावखेड्यातील राजकारण लयच भारी असते. गावात आपलीच सत्ता कशी अबाधित राहील, यासाठी स्थानिक नेत्यांकडून जिवाचे रान केले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील आक्सापूर येथे रोजगार सेवक पदासाठी झालेल्या ग्रामसभेतील रंगतदार निवडणुकीत याचा प्रत्यय आला. (Congress-backed panel's victory in Aksapur of Chandrapur District)
ग्रामपंचायतमधील सत्ताधारी व विरोधकांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरविले. ग्रामसभेतून निवडणूक झाली अन् ग्रामपंचायतीत विरोधी बाकांवर असलेल्या काँग्रेस समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी निवडणुकीत बाजी मारली. सत्ताधाऱ्यांनी उभा केलेला उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. विरोधकांच्या उमेदवाराची निवड झाल्यानंतर गावात जंगी मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
गावातील रोजगारपदाची निवडणूक सत्ताधारी व विरोधकांनी अतिशय प्रतिष्ठेची केल्याने याबाबत चर्चा सुरू झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील ग्रामपंचायतीवर भाजप समर्थित पॅनेलची सत्ता आहे. सपना तामगाडगे या सरपंच असून, चंद्रजित गव्हारे यांच्याकडे उपसरपंचपदाची धुरा आहे. आक्सापूर ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाची निवड करण्यासाठी ग्रामसभा बोलविण्यात आली होती.
सत्ताधारी व विरोधकांनी रोजगार सेवक आपल्याच गटाचा निवडून यावा, यासाठी जोरदार फिल्डिंग लावली. या पदासाठी एकूण सहा उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. ग्रामपंचायतीच्या सत्तापक्षाकडून अविनाश बुरांडे ,तर विरोधात असलेल्या काँग्रेस समर्थित पॅनेलने उमाजी मडावी यांना मैदानात उतरविले. पेल्लूर येथील स्वप्निल नागापुरे यांनीदेखील या पदासाठी नामांकन दाखल केले. आक्सापुरातील स्थानिक गोपीनाथ मुंडे सभागृहात ग्रामसभा घेण्यात आली. सत्ताधारी, विरोधक व इतर उमेदवारांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती.
गावातून ७७९ लोकांनी सहभाग नोंदवत ‘रेकार्ड ब्रेक’ मतदान केले. रोजगार सेवक पदाच्या निवडीसाठी झालेली गर्दी बघून ग्राममपंचायतीच्या निवडणुकीसारखीच स्थिती निर्माण झाली होती. मतदान झाल्यानंतर काँग्रेस समर्थित पॅनेलचे उमेदवार उमाजी मडावी यांनी २८४ मते घेत विजय मिळविला. स्वप्निल नागापुरे यांना १७४ मतं मिळाली. भाजप व सत्ताधारी पक्षाचे उमेदवार अविनाश बुरांडे यांना १२५ मतं पडली. ते तिसऱ्या क्रमांकावर गेले.
आपल्या पॅनेलचा उमेदवार निवडून येताच महेंद्र कुनघाटकर, दशरथ सोयाम, ऋषी धोडरे, नानाजी पेंदोर, अनिकेत बुरांडे, नंदाजी गव्हारे, सोमनाथ पिपरे यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांनी जल्लोष केला. गुलाल उधळत मिरवणूक काढण्यात आली. रोजगार पदासाठी झालेल्या या छोट्या निवडणुकीतही रस्सीखेच झाल्याने गावातील राजकारण किती महत्त्वाचे असते हे पुन्हा अधोरेखित झाले. सत्ताधारी गटाच्या उमेदवाराचा या निवडणुकीतील पराभव होणे, ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.