Nitin Gadkari and Devendra Fadanvis on NMC Election
Nitin Gadkari and Devendra Fadanvis on NMC Election Sarkarnama
विदर्भ

गडकरी, फडणवीसांना पत्करायची नाही जोखीम, नगरसेवकांना पाठवले घरोघरी...

अतुल मेहेरे

नागपूर : आगामी नागपूर महापालिकेच्या निवडणुकीचे वेध सत्ताधारी भाजप नगरसेवकांना लागले आहेत. भाजप नगरसेवकांनी आतापासूनच घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क सुरू केला आहे. यासाठी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांची पुस्तिका भाजप नगरसेवकांनी तयार केली. ही पुस्तिका घेऊन नगरसेवक मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. या माध्यमातून अप्रत्यक्ष प्रचारच नगरसेवकांनी सुरू केला आहे.

गेल्या १५ वर्षांपासून नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, अँटी इनकम्बन्सी आणि काही नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळं मतदार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळं भाजप कुठलीही जोखीम पत्करायला तयार नाही. त्यामुळं आचारसंहितेपुर्वी मतदारांशी संपर्क वाढवा, अशा सूचना नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळं नगरसेवक पाच वर्षांचा लेखाजोखा घेऊन मतदारांना मतांचा जोगवा मागत घरोघरी फिरत आहेत. गेल्या दीड दोन वर्षांत कोरोनाच्या संक्रमणामुळे नगरसेवकांचा नागरिकांशी संपर्क तुटला होता. आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्याचा फटका भाजपला बसू नये, म्हणून पक्षाने नगरसेवकांना लोकसंपर्क वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोकांच्या घरोघरी जाऊन गेल्या पाच वर्षांत केलेली कामे प्रगतीपुस्तीकेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम नगरसेवकांनी सुरू केले आहे.

गेल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रभागातील विविध समस्या मार्गी लावण्याचे काम केले. जी काही विकास कामे यामध्यमातून करू शकलो, त्याचा अहवाल पुस्तिकेमध्ये मांडला आहे. लोकांचे प्रश्‍न, त्यांच्या समस्या आणि प्रभागाचा विकास कशा पद्धतीने आम्ही केला, ते सांगण्याचे काम करत आहो, असे ज्येष्ठ नगरसेवक आणि भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले. एका प्रभागामध्ये तीन ते चार नगरसेवक असल्याने प्रत्येक नगरसेवक एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे काम करीत होते, असे लोकांकडून सांगितले जाते.

भाजपच्या नगगरसेवकांबद्दल जनतेमनध्ये नाराजी आहे का, असे विचारले असता, ॲड. मेश्राम म्‍हणाले, जनतेमध्ये आमच्याबद्दल कुठलीही नाराजी नाही. पण मी जे काम आजपर्यंत केलं, ते माझ्या लोकांना सांगणं आवश्‍य आहे आणि मी हे माझं कर्तव्य समजतो. त्यामुळे मी प्रत्येकाच्या घरी जाऊन केलेल्या कामांची माहिती देत आहे. लोकांनी मला मते दिली आहेत, माझ्यावर विश्‍वास दाखवला आहे. त्यामुळे माझी त्यांच्याशी बांधिलकी आहे. लोकांना सांगत असलेल्यापैकी एकादे काम झाले नसेल किंवा अर्धवट असेल, तर या उपक्रमात लोकांनी ते मला सांगावे, तसे ते सांगतिलही आणि आम्हाला त्यावर उपाययोजना करता येतील.

सर्व नगरसेवकांनी आपल्या कामाचा अहवाल तयार करावा, तो पुस्तकरुपात छापावा आणि जनतेच्या समक्ष आपले म्हणणे मांडण्यासाठी जावे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीमध्ये सांगितले आहे. त्याप्रमाणे नगरसेवक कामाला लागले आहेत. भाजपप्रमाणे इतर पक्षांनी मात्र अद्यापही अशी काही सुरूवात केल्याचे दिसत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT