Amit Shah, Nana Patole and Ashok Chavan Sarkarnama
विदर्भ

Gondia Congress Dispute : गोंदिया जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफुस, काही पदाधिकारी वेगळी भूमिका घेणार ?

Amit Shah : या मेळाव्याला गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.

अभिजीत घोरमारे

Gondia Congress Dispute : गोंदिया जिल्हा काँग्रेसमध्ये असलेली अंतर्गत धुसफुस समोर येऊ लागली आहे. काही पदाधिकारी वेगळी भूमिका घेणार, अशा चर्चांना जिल्ह्यात उधाण आले आहे. आज (ता. 14) मुंबई येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार असून त्यांच्या उपस्थितीत इतर पक्षांतील काही दिग्गजांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.

यावेळी जिल्ह्यातील काही जण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपच्या आजच्या मुंबईतील मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील आठवड्यात गोरेगाव येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान काँग्रेसचे प्रदेश महासचिव पी.जी. कटरे, जिल्हा उपाध्यक्ष झामसिंग बघेले, चंद्रशेखर बोपचे, अमर वराडे हे गैरहजर होते. तर काही पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.

गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीतील अंतर्गत धुसफुस बाहेर आली होती. त्यातच सोमवारी (ता. 12) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान अशोक चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवत गोंदिया जिल्हा काँग्रेसमधील काही नेते वेगळा विचार करण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजकारणात कोण कधी कुठे असेल, हे सांगता येत नाही. नेमके हेच चित्र सोमवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर स्पष्ट झाले. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील 17 आमदार जाणार, अशी चर्चा रंगली आहे. गोंदिया जिल्हा काँग्रेसमधील एक गट मागील काही दिवसांपासून नाराज आहे. ही नाराजी हे पदाधिकारी वेळोवेळी बोलूनसुद्धा दाखवीत आहेत.

आता अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेने काँग्रेसमधील नाराज नेत्यांनासुद्धा बळ मिळाल्याचे बोलले जाते. काँग्रेसचे महासचिव पी.जी. कटरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गोंदिया काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या कार्यप्रणालीमुळे काही कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगितले. याच नाराजीमुळे त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास नवल वाटायला नको, अशी प्रतिक्रिया दिली.

काँग्रेसमधील ते नाराज पदाधिकारी कोण व ते काय वेगळी भूमिका घेणार, याची चर्चा सध्या जिल्हा काँग्रेसच्या गोटात रंगली आहे. दुसरीकडे गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीत कुठलाही अंतर्गत वाद अथवा धुसफुस नाही. काही नाराजी असल्यास ती समन्वय साधून दूर केली जाईल. जिल्ह्यातील एकही काँग्रेस पदाधिकारी भाजपमध्ये जाणार नाही, असा विश्वास काँग्रेसचे गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोडे यांनी व्यक्त केला. असे असले तरी गोंदिया जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नक्कीच आहे, यात काही शंका नाही.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT