Manohar Chandrikapure Sarkarnama
विदर्भ

Gondia Politics : आमसभेत अधिकारी गैरहजर; आमदारांनी कामकाजाचे वाभाडेच काढले !

Show Cause Notice : कार्यक्रम व्यवस्थापक अनुपस्थित असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.

अभिजीत घोरमारे

Gondia Politics : पहिल्या टर्मचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्यावर आमदारकीचा रंग आता चढू लागला आहे. आपण बोलावलेल्या आमसभेत चक्क अधिकारी अनुपस्थित असल्याने त्या अधिकाऱ्यांचा कामकाजाचे वाभाडे आमदार महोदयांनी काढले. त्यामुळे आमदार चंद्रिकापुरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

स्थानिक अर्जुनी मोरगाव पंचायत समिती कार्यालयात 22 फेब्रुवारीला वार्षिक आमसभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार मनोहर चंद्रिकापुरे होते. यावेळी गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत गणवीर, पंचायत समिती सभापती सविता कोडापे, उपसभापती होमराज पुस्तोडे, जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे, पंचायत समिती सदस्य चंद्रकला ठवरे, कुंदा लोगडे संदीप कापगते, नूतनलाल सोनवाने, नाजूक कुंभरे, प्रमोद लांडगे, घनश्याम धामट, भागेश्वरी सयाम, प्रभारी गटविकास अधिकारी विलास निमजे उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या आमसभेत तालुक्यातील ग्रामस्थांनी विविध मुद्दे उपस्थित केले. उमेदच्या कार्यप्रणालीवर आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यक्रम व्यवस्थापक अनुपस्थित असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत गावागावांत होणा-या भूमिपूजन प्रसंगी सरपंच व पदाधिकाऱ्यांना बोलाविले जात नाही, याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान घरकुल योजनेत अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, लाभार्थ्यांचा प्राधान्य क्रम योग्यरीत्या ठरवावा, मनरेगा योजनेचा लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे, ग्रामसेवकांनी ग्रामस्थांचे प्रश्न प्राधान्य क्रमाने निकाली काढावे. जनसामान्यांच्या प्रश्नांची उकल योग्य रीतीने होण्याच्या दृष्टीने आमसभेसाठी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना निमंत्रण दिले जाते. मात्र ते उपस्थित राहत नसल्याबद्दल आमदारांनी खंत व्यक्त केली. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले गेले आहे.

ही आमसभा सुरुवात होताच मोरगाव अर्जुनी येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या पाच वर्षांपासून सावळागोंधळ सुरू असल्याच्या तक्रारीने आमदार महोदयांचे डोके ठणकले. आमसभेत उपस्थित झालेल्या या प्रश्नावर आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी तत्कालीन मुख्याध्यापकावर कारवाई करावी, चौकशी करण्यासंदर्भात आयुक्त नागपूर व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करावा, तसेच दहा वर्षांपासूनच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करावी असे निर्देश दिले.

अधिकारी कर्मचाऱ्यांना उपदेश करताना हेवेदावे बाजूला सारून प्रशासनात गती आणण्याचे आवाहन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले. ग्रामपंचायत हद्दीत विकास कामे होत असताना ग्रामपंचायतीला माहिती देणे व सरपंच पदाधिकाऱ्यांना भूमिपूजन प्रसंगी बोलावणे आवश्यक असल्याचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी सांगितले आहे. दरम्यान या आमसभेमध्ये उठलेला गोंधळ चर्चेचा विषय ठरला आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT