Bhandara Election
Bhandara Election Sarkarnama
विदर्भ

Bhandara Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणूक : भंडाऱ्यात ‘जाऊ’ बाई जोरात; होणार काट्याची टक्कर...

Abhijit Ghormare_Guest

Grampanchayat Election : एकवेळ विधानसभेची निवडणूक परवडली पण ग्रामपंचायत निवडणूक नक्को रे बाबा… अशी परिस्थिती असते. गावगाड्याच्या राजकारणात अनेक समीकरणे बदलत असतात. अगदी अखेरच्या दिवसापर्यंत काय होईल, हे सांगता येत नाही. पण भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील दिघोरी-आमगावमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत दोन सख्या जावा आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे जनता सद्यःस्थितीत ‘जाऊ बाई जोरात...’चा अनुभव घेत आहेत.

दोन जावांमध्ये सरळ निवडणूक होणार आहे. एकाच कुटुंबात सरपंच पदाच्या दोन प्रतिस्पर्धी महिला उमेदवार असल्याने कोणाला मत द्यायचे, यासाठी सामान्य नागरिक डोके खाजवत असताना त्यांचे नातेवाईक मात्र पेचात सापडले आहे. एका कुटुंबात दोन भावांच्या पत्नींमध्ये जाऊ-जाऊ मध्ये घराचा कारभार चालविण्यावरून घरगुती वाद नेहमी बघायला मिळतो. मात्र हाच वाद आता ग्रामपंचायत निवडणुकीतही (Election) पहायला मिळत आहे. चक्क गावाच्या कारभार आपल्या हाती घेण्यासाठी एकाच कुटुंबातील दोन जावा सरपंच (Sarpanch) पदासाठी एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत.

टीव्ही सीरियलला शोभेल, अशी ही लढत होत आहे. आता एकाच कुटुंबात सरपंच पदाच्या दोन प्रतिस्पर्धी महिला उमेदवार असल्याने जाऊ विरूद्ध जाऊ निवडणूक होत आहे. जिल्हाभरात याच निवडणुकीची चर्चा सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात १८ डिसेंबरला ३०५ ग्राम पंचायतींच्या निवडणुका होत आहेत. दिघोरी ग्रामपंचायतीमध्ये भावकीत निवडणुकीचा रणसंग्राम रंगला आहे. या गावातील नागदेवे कुटुंबातील दोन जावा सरपंच पदासाठी निवडणूक लढवत आहेत. मोठी जाऊ वीणा नागदेवे ह्या आपल्या पॅनलकडून सरपंचपदासाठी लढत असून त्यांच्या छोट्या जाऊ पायल नागदेवे सरपंच पदासाठी अपक्ष निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीत कोणीही जिंकून येऊ दे, मात्र पुढे आम्ही एकत्र असणार असल्याचे दोघीही सांगत आहेत. मात्र निवडणुकीच्या प्रचारात दोघीही एकमेकांना "काटे की टक्कर" देत आहे.

जाऊ विरूद्ध जाऊ सरळ निवडणूक होत असल्याने गावात ही निवडणूक चुरशीची ठरली आहे. दोघींचेही गावात दांडगे प्रस्थ आहे. त्यामुळे गावकरी कोणाला मत द्यायचे म्हणून बुचकल्यात पडले आहेत. हे कमी होते की काय नागदेवे कुटुंबाचे नातेवाईकही या निवडणुकीत मतदार असल्याने कोणाला मत द्यायचे, या प्रश्‍नाचे उत्तर त्यांना सापडत नाहीये. गुप्त मतदान असल्याने नातेवाइकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. नातेवाइकांनी कोणाचाही प्रचारात सहभागी न होता आपली बाजू सेफ करून घेतली आहे. जाहीरनामा चांगला असण्यापेक्षा काम करण्याची क्षमता तपासूनच गावकरी मतदान करणार, हे मात्र खरे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, या उक्तीप्रमाणे होऊ नये, म्हणजे झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT