vijaykumar gavit google
विदर्भ

Guardian Minister : गावित निघाले हुशार अन् अनुभवी; एकाच झटक्यात सगळं समजले...

अभिजीत घोरमारे

Bhandara News : रुपेरी पडद्यावर गाजलेला अनिल कपूरचा ‘नायक’ हा चित्रपट आठवतोय का? ज्यात अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री असतो. त्यात मंत्र्याचा पीए असलेला परेश रावल सांगत असतो.. ‘एक तो ये निकला पढालिखा... और उपर से समझदार... एक दिन में सब समझ गया...’ असाच काहीसा प्रसंग भंडाऱ्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित यांच्याबाबतीत अनुभवायला मिळाला. (Guardian Minister Vijaykumar Gavit reprimanded the officials)

भंडारा जिल्हाचे पालकमंत्री म्हणून राज्याचे आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी पदभार स्वीकारला. त्यासाठी ते गुरुवारी (ता. २६) गावित जिल्ह्यात दाखल झाले आहेत. सूत्रं स्वीकारताच त्यांनी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक नियोजन भवनात घेतली आहे. वेगवेगळ्या विभागाचा आढावा घेण्यास त्यांनी सुरुवात केली. अनेक दिवसांपासून जिल्ह्यात ‘मुरलेल्या’ अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना काय कळतेय, ते तर आज पहिल्यांदाच आलेत, या आविर्भावात विजयकुमारांना उत्तराच्या गावातील या गल्लीतून ने.. त्या गल्लीतून ने असा प्रकार सुरू केला. वेगवेगळ्या प्रश्नांच्या उत्तरात विशेषत: बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी त्यांना उत्तरं देताना वेगवेगळी वळणं घेत आम्ही अख्ख्या गावाला कसं फिरवतो हे दाखविण्याचा प्रयत्न केला.

सुरुवातीला गावित यांनी शांतपणे सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले, पण आधी सांगितल्याप्रमाणे गावित ठरले हुशार.. त्यातही राजकारणातील अनुभवी.. कोण कसं फिरवतो हे त्यांच्या चटकन लक्षात आलं. मग त्यांनीही आणखी खोलात जात प्रश्न विचारणे सुरू केलं; पण अधिकारी क्लुप्त्या लढवितच होते.

खासदार सुनील मेंढे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, पोलिस अधीक्षक लोहित मतानी, उपवनसंरक्षक पवन जेफ, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे आदींसमोर अधिकाऱ्यांचा हा खेळ सुरू होता. एकाही अधिकाऱ्याला धड माहितीही देता येत नाही, हे गावित यांना कळलं. मग मात्र त्यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम देण्यास सुरुवात केली. यापुढं बैठकीला यायचं असेल तर परिपूर्ण माहिती घेऊनच येत चला, असं त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं.

जिल्ह्यातील विकासकामे करताना ती दर्जेदार होणं अपेक्षित आहे. जिल्हा नियोजन समितीद्वारे होणाऱ्या कामांची गुणवत्ता उच्च दर्जाची असली पाहिजे, निधी मागणी केल्यानंतर त्या निधीचे उपयोजन हे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार झाले पाहिजे. नियमानुसार काम झालं नाही तर यापुढे आपणच गावातून कशी वरात काढतो ते बघा, असा अप्रत्यक्ष इशाराच विजयकुमारांनी दिला. त्यामुळे हे साहेब काही ‘झेंडा टू झेंडा’ येणारे पालकमंत्री दिसत नाही ही बाब लक्षात आल्यानंतर भर एसी सभागृहात अनेक अधिकाऱ्यांना घाम फुटला.

(Edited by : Prasannaa Jakate)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT