Chandrashekhar Bawankule-Sharad Pawar-Harshvardhan Patil  Sarkarnama
विदर्भ

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांनी संयम राखावा; पवारांच्या भेटीनंतर भाजप नेत्याचा सबुरीचा सल्ला

Chandrashekhar Bawankule PC : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे, त्यामुळे ते पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, असा सवाल विचारला जात आहे.

Vijaykumar Dudhale

Nagpur, 23 August : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे, त्यामुळे पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अशी चर्चा रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून ‘ज्यांना थांबायचे नाही, त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. हर्षवर्धन पाटील यांनी संयम ठेवावा,’ असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, समरजितसिंह घाटगे (Samarjeetshinh Ghatge) हे निवडणूक लढविण्यासाठी शरद पवार गटाकडे जात आहेत, त्यामुळे त्यांना कोण थांबवणार आहे, असा हताश सवालही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे.

इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दत्तात्रेय भरणे आमदार आहेत, त्यामुळे विद्यमान आमदार या नात्याने महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार आमदार भरणे यांना पुन्हा महायुतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, हे लक्षात आल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil ) यांनीही तयारी सुरू केली आहे.

माजी मंत्री पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे, त्यामुळे ते पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, असा सवाल विचारला जात आहे. त्या चर्चेबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, हर्षवर्धन पाटील यांनी संयम राखावा. पण ज्यांना थांबायचेच नाही, त्यांना कोणीही थांबवू शकत नाही.

समरजितसिंह घाटगे यांच्याबाबतही बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, कागल विधानसभा मतदारसंघाची जागा ही अजित पवार यांच्याकडे आहे, त्यामुळे समरजितसिंह घाटगे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जात आहेत, निवडणूक लढण्यासाठी ते त्यांच्याकडे जात आहेत, त्यांना कोण थांबवणार आहे, असा हताश सवालही बावनकुळे यांनी विचारला.

जागा वाटपाच्या मुद्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, पुढील सात दिवसांत चर्चा झाली पाहिजे, अशी भाजपची मागणी आहे. निवडणुकीला आता खूप काळ राहिला नाही. सर्वच मतदार संघात सेंटीग गेटिंग होणार नाही. कोण निवडणून येईल, यावर चर्चा करून जागा वाटपाबाबतचा निर्णय होईल.

राज ठाकरे हे राज्याचे नेते आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून बॅनर का लागू नये, असा सवाल विदर्भात राज ठाकरे यांच्या भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेल्या बॅनरवर बोलताना केला. महायुतीचे सरकार येण्याबाबत सर्वांना शंका असली तरी आम्हाला आमचं सरकार येईल, यावर विश्वास आहे, असेही बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT