Vijay Wadettiwar & Manoj Jarange Patil Google
विदर्भ

Vijay Wadettiwar : धमकी देणाऱ्यांचा शोध सुरू, पोलिसांनी घेतला सुरक्षेचा आढावा

प्रसन्न जकाते

Nagpur News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेता तथा विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मिळणाऱ्या धमक्यांचं प्रकरण गृह विभागानं गांभीर्यानं घेतलंय. यासंदर्भात वडेट्टीवार यांनी सोमवारी (ता. १४) नागपूर येथे माहिती दिली होती. सातत्यानं मिळणाऱ्या धमक्यांबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्रानं कळविलं होतं. वडेट्टीवार यांची ही तक्रार प्राप्त होताच गृह विभाग कामाला लागलंय.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीनं विजय वडेट्टीवार यांची भेट घेत धमकीच्या प्रकरणाबाबत त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. (Home Department of Maharashtra in Action Mode After Leader Of Opposition Vijay Wadettiwar gets Life Threat on OBC & Marahta Reservation Issue)

मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भात वक्तव्य केल्यानंतर आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं होतं. फोन आणि मेसेजवरून त्यांना या धमक्या मिळत आहेत. वडेट्टीवार यांना धमकी देणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सूचना दिल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी वडेट्टीवार यांचं निवासस्थान गाठलं.

अधिकाऱ्यांनी वडेट्टीवार यांच्याकडून धमकी देणाऱ्यांचे क्रमांक आणि मेसेजचा तपशिलही घेतलाय. या क्रमांकांची पोलिस मोबाईल कंपन्यांकडून सविस्तर माहिती घेणार आहेत. सोमवारी पोलिसांनी वडेट्टीवार यांच्या नागपूर येथील निवासस्थानाच्या सुरक्षेचा आढावाही घेतला. सध्या वडेट्टीवार यांना वाय प्लस श्रेणीची सुरक्षा आहे. या सुरक्षेत तीन सुरक्षा जवान, एक वाहन असा ताफा असतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सातत्यानं वडेट्टीवार यांना धमक्या मिळत असल्यानं यासंदर्भात गृह विभागानं अहवालही मागविलाय. त्यानुसार वडेट्टीवार यांच्या सुरक्षेत वाढ करायची का, याचा निर्णय गृह विभाग लवकरच घेणार असल्याचं नागपूर पोलिसांनी स्पष्ट केलं. सध्या नागपुरातील अनेक व्हीआयपी नेत्यांना सुरक्षा आहे. नागपुरात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, माजी सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे आदींचा समावेश आहे.

नागपुरात वास्तव्यास असणाऱ्या यापैकी अनेकांना वाय श्रेणीपासून झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे. नागपूर मध्यवर्ती ठिकाण व संघ मुख्यालय असल्यानं येथे देशभरातील अति महत्त्वाच्या व्यक्तींचं येणं-जाणं कायम सुरू असतं. त्यांच्या सुरक्षेचा ताणही नागपूर शहर पोलिसांवर असतो.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT