Ravi Rana, Navneet Rana  Sarkarnama
विदर्भ

Amravati Political News : अमरावतीच नाहीतर राज्याच्या राजकारणात चर्चेत राहणाऱ्या राणा दाम्पत्याला 'मंत्री' पदाची स्वप्नं !

Deepak Kulkarni

Amravati : आमदार, खासदार बनून काहीही उपयोग होत नाही असे अलिकडच्या काळातील राजकारणातील समीकरण झाले आहे. असली पॉवरवर मंत्रिपदात आहे. त्यामुळे सत्ताधारी असो की विरोधक मंत्रिपद साऱ्यांनाच हवेहवेसे आहे. अशात अमरावतीच्या दोन नेत्यांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. केंद्रात नाहीतर राज्य या दोनपैकी एका ठिकाणी कुठेही मंत्रिपद मिळावे यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी त्यांचे हनुमान चालिसेतील ‘नासे रोग हरे सब पीरा...’ अशी सतत प्रार्थना करत त्यांचं ‘राममिलाय राजपद दिना..’ची स्वप्नं पाहणं सुरू आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा ही ती दोन नावे आहेत. अमरावतीच्याच काय तर राज्याच्या राजकारणात ही नावे चांगलीच चर्चेत असतात. काँग्रेसच्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर, प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांच्यासोबत त्यांना थेट ‘पंगा’ सुरू आहे. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, इर्थपर्यंत हा वाद विकोपाला जात आहे. अपक्ष आमदार व खासदार असतानाही राणा यांची भाजपशी इतकी सलगी का, असा प्रश्न उपस्थित केला जातो, त्याचे उत्तर म्हणजे राणा यांची नेहमीची सवय ‘जिधर दम, उधर हम’.

देशात भाजपचा जोर वाढल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बहुमताचे सरकार केंद्रात आरुढ झाले. राज्यातही भाजपला बहुमत मिळाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत. पुन्हा कुणाचे पारडे जड आहे, याचा कानोसा घेत राणा दाम्पत्याने भाजपशी सलगी वाढविली, असे सांगण्यात येते. तेव्हा ‘घड्याळ’ बांधण्याच्या तयारीत असलेल्या राणांनी अचानक हाती ‘कमळ’पुष्प घेतले. खासदार नवनीत राणा या मोदी, शाहांची तर आमदार रवी राणा देवेंद्र फडणवीस यांची स्तुतीसुमने गाऊ लागले. केंद्रात नितीन गडकरींपेक्षाही कुणाच्या शब्दाला वजन असेल, तर ते नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस हे ओळखत राणा त्यांचे खुपच कमी वेळात विश्वासू बनले.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले व उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झालेत. इतिहासाची पाने चाळली तर राणा आणि उद्धव ठाकरे यांच्यात तसे कोणतेही वैर नाही. अमरावतीमध्ये राणांचा वाद खासदार आनंदराव अडसूळ व त्यांचे सुपुत्र माजी आमदार अभिजित अडसूळ यांच्यापुरता होता.

मात्र, अचानक राणा यांना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे चुकीचे वागत असल्याचे ज्ञान प्राप्त झाले. त्यांनी महाविकास आघाडी सरकारला त्यातल्या त्यात उद्धव ठाकरेंचा सुबुद्धी यावी म्हणून हनुमंताचा धावा केला. राणा व त्यांच्या समर्थकांनी हनुमान चालिसा पठणाची अशी मोहीम राबविली की ते भाजपच्या गळ्यातील ताईतच झालेत. परिणामी भाजपचे नेते राणांची ढाल बनले. राणांवरील कारवाईचा भाजपनेही निषेध केला.

एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यावेळी आमदार राणा यांना राज्य मंत्रीपद मिळेल असे संकेत होते. राणा समर्थकांनी जल्लोषाची तयारीही केली होती. मात्र त्यांना धीर धरण्याचा सल्ला देण्यात आला. कालांतराने यात बच्चू कडुंचा हात असल्याची चर्चा रंगली. त्यातूनच राणा विरुद्ध बच्चू कडु असा वाद रंगल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

आता अजित पवारांसह राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये सामील झाल्याने व निवडणुकाजवळ येत असल्याने मंत्रिमंडळाच्या विस्ताराची आशा तशी कमी आहे. परंतू, राज्यात भविष्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यास अमरावतीमधुन मंत्रिपदासाठी रवी राणा व बच्चू कडु ही नावे प्रबळ मानली जातात. मंत्रिपद मिळावे यासाठी तर आमदार बच्चू कडू यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.

रवि राणांना राज्यात मंत्रिपद मिळाले तर आनंदच आहे. परंतु तसे झाले नाही तर त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांना केंद्रात किमान राज्यमंत्रिपद मिळावे, यासाठी ते पूर्ण ताकदीनीशी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते.

(EditEed By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT