MP Krupal Tumane on Eknath Shinde
MP Krupal Tumane on Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की, पंचनाम्याच्या भानगडीत पडू नका...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. जगाचा पोशिंदा म्हणवल्या जात असलेल्या शेतकऱ्यांकडे दोन वेळच्या खाण्याचीही व्यवस्था नाही. मी शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये, बांधावर जाऊन चौकशी केली, त्यांच्याशी बोललो माहिती घेतली. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे, असे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने म्हणाले.

कृषी विभागाने कृषी विभागाने वेगळे पंचनामे केले, महसूल विभाग आपले वेगळेच पंचनामे करत आहे. हा पंचनाम्यांचा खेळ असाच सुरू राहील, तर शेतकऱ्यांना, (Farmers) घरांचे नुकसान झालेल्या लोकांना भरपाई कधी मिळणार, हा आज खरा प्रश्‍न आहे. अशात मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एसडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट नुकसान भरपाई आणि दोन हेक्टरची मर्यादा वाढवून तीन हेक्टर केल्याचा निर्णय घोषित केला. निर्णय अतिशय चांगला आहे आणि सर्वांनाच माहिती आहे की, जवळपास सर्व शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. त्यामुळे ही मदत सरसकट मिळावी, असे खासदार तुमाने (MP Krupal Tumane) म्हणाले.

आता नुकसानाचे पंचनामे करण्याच्या भानगडीत न पडता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार आहो. अतिवृष्टीमुळे संत्रा आणि मोसंब्या गळून पडत आहे. लाख मोलाचा माल शेतकऱ्यांना धुऱ्यावर फेकून द्यावा लागत आहे. त्यामुळे त्यांनाही सरसकट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. कापूस, सोयाबीन आणि इतर उत्पादकांसाठी घोषणा झाली आहे. पण बागाईतदार फळ उत्पादकांसाठी अद्यापही घोषणा झाली नाही, तीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी करावी, यासाठी त्यांना भेटणार आहे, असे खासदार तुमाने यांनी सांगितले.

सध्या सुरू असलेल्या पंचनाम्यावर केवळ माझाच नाही, तर सर्व शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. काही पटवाऱ्यांनी कार्यालयात बसून सर्वे केला. काहींनी तर सरपंच किंवा गावपुढाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून माहिती घेऊन बसल्या जाग्यावर कागदांवर रेघोट्या ओढल्या आहेत. असे बोगस सर्वे टाळण्यासाठी पटवाऱ्यांनी सर्वे केल्याचा फोटो जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाइटवर सर्वेअरने अपलोड करावा, असा नियम करण्याबाबतसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे. म्हणजेच पंचनामे खरोखर झाले की नाही हे कळेल, असेही खासदार तुमाने यांनी सांगितले.

प्रशासनावर, अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर माझा पूर्ण विश्‍वास आहे. पण शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्‍वास नाही. कारण मी जेव्हा मतदारसंघात फिरलो, तेव्हा शेतकऱ्यांना त्यांच्या भावना माझ्याजवळ व्यक्त केल्या. त्यामुळे शेतकरी आणि प्रशासन यांच्यामध्ये सेतू बांधण्याचे काम आता आम्हा पदाधिकाऱ्यांना करावे लागणार आहे. जेणेकरून कुणीही नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये, असे खासदार कृपाल तुमाने यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT