Vijay Wadettiwar vs Pratibha Dhanorkar Dispute Sarkarnama
विदर्भ

Congress News : काँग्रेसच्या 16 नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस; नागपूर विभागीय आयुक्तांकडून कडक कारवाईला सुरुवात

Congress News : चंद्रपूर काँग्रेसमधील गटनेता वादात खासदार प्रतिभा धानोरकर गटातील १६ नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली असून २२ जुलै रोजी विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी होणार आहे.

प्रमोद काकडे

Congress News : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या गटनेता वादाला नवे वळण मिळाले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर गटातील सर्व १६ नगरसेवकांना विभागीय आयुक्त कार्यालयाने सुनावणीसाठी नोटीस बजावली आहे. विद्यमान गटनेते राजेश मुरली अडूर यांनी दाखल केलेल्या अर्जावरून महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १९८६ अंतर्गत ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

धानोरकर गटातील १६ सदस्य १५ जून २०२६ रोजी गटनेता म्हणून अडूर यांनी बोलविलेल्या बैठकीस अनुपस्थित राहिल्यामुळे संबंधित सदस्यांविरुद्ध अपात्रतेची कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणात आपले म्हणणे मांडण्यासाठी २२ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश नोटिशीद्वारे देण्यात आले आहेत.

प्रतिभा धानोरकरांकडे गटनेतेपद येणार?

चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेतेपदाच्या वादाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन्ही गटांचे म्हणणे आणि संख्याबळ तपासल्यानंतर विभागीय आयुक्तांकडील सुनावणी पूर्ण झाली असून प्रकरण निर्णयासाठी राखून ठेवण्यात आले आहे. संख्याबळ पाहता खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटातील सुरेंद्र अडबाले हे काँग्रेसचे महानगरपालिकेतील गटनेते होतील, याबाबत आता फारशी शंका उरलेली नाही.

चंद्रपूर महानगरपालिकेत खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार अशा दोन गटांत नगरसेवक विभागले गेले आहेत. या दोन नेत्यांमधील विसंवादामुळे बहुमताच्या जवळ असूनही महानगरपालिकेतील सत्ता काँग्रेसच्या हातातून गेली. या दोन्ही नेत्यांतील वाद दिल्लीपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर खासदार धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यात समझोता झाला.

त्यानुसार गटनेतेपद वडेट्टीवार समर्थक राजेश अडूर यांच्याकडे देण्यात आले. पहिली अडीच वर्षे ते गटनेतेपदी राहतील, असे ठरले होते. मात्र, खासदार धानोरकर यांनी दिलेली स्थायी समिती सदस्यांची नावे अडूर यांनी वगळल्याने वादाची ठिणगी पडली. त्यानंतर अडूर यांनी सभागृह नेतेपदही स्वतःकडेच ठेवले. त्यामुळे काही नगरसेवकांमध्येही नाराजीचा सूर उमटू लागला.

परिणामी काँग्रेसच्या एकूण २७ नगरसेवकांपैकी १६ नगरसेवकांचे संख्याबळ खासदार धानोरकर यांच्या बाजूने गेले आणि अडूर यांना गटनेतेपदावरून हटविण्याची तयारी सुरू झाली. संख्याबळाच्या आधारे विभागीय आयुक्तांनी सुरेंद्र अडबाले यांना गटनेते म्हणून मान्यता देत आदेशही जारी केला होता.

मात्र, या आदेशाला आमदार वडेट्टीवार गटाने उच्च न्यायालयात आव्हान देत अंतरिम स्थगिती मिळविली. त्यानंतर पुढील सुनावणीत हे प्रकरण पुन्हा विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी ९ जुलै रोजी झाली. त्यावेळी खासदार धानोरकर गटाचे १६ नगरसेवक प्रत्यक्ष विभागीय आयुक्तांसमोर उपस्थित झाले होते.

राजेश अडूर यांनी वेळ मागितल्याने पुढील सुनावणी आज सोमवारी घेण्यात आली. सोमवारी अडूर हे आपल्या समर्थक १० नगरसेवकांसह विभागीय आयुक्तांसमोर हजर झाले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सुनावणी पूर्ण झाली असून प्रकरण निर्णयासाठी राखून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी नव्या गटनेत्याच्या नावाने आदेश जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT