Dharmpal Meshram and Sanjay Raut Sarkarnama
विदर्भ

संजय राऊत दोषी नसतील, तर ईडी चौकशीच्या फेऱ्यातून ते सुखरूप बाहेर पडतील !

ज्या प्रकरणात काहीतरी काळंबेरं वाटेल, त्यामध्ये चौकशी केली जाईल. यामध्ये भारतीय जनता पक्षाचा दुरान्वयेही कुठे संबंध येत नाही, असेही ॲड. मेश्राम (Dharmpal Meshram) म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने (सक्तवसुली संचालनालय) फास आवळला. काल चौकशी करून आज त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि सध्या विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. यामध्ये संजय राऊत दोषी नसतील, तर ईडी चौकशीच्या फेऱ्यातून ते सुखरूप बाहेर पडतील, असे भाजपचे (BJP) प्रवक्ते ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.

ईडी (ED) म्हणजे संविधानिक व्यवस्थेतून निर्माण झालेली संस्था आहे. या संस्थेची कार्य करण्याची स्वतःची एक पद्धत आहे, त्यानुसार ते आपले काम करीत असतात. ज्या प्रकरणात काहीतरी काळंबेरं वाटेल, त्यामध्ये चौकशी केली जाईल. यामध्ये भारतीय जनता पक्षाचा दुरान्वयेही कुठे संबंध येत नाही, असेही ॲड. मेश्राम (Dharmpal Meshram) म्हणाले. काही महिन्यांपूर्वीच पत्राचाळ प्रकरणात ईडीने संजय राऊत (Sanjay Raut) यांना समन्स बजावले होते. मात्र अधिवेशनाचे कारण सांगून त्यांनी चौकशीला हजर राहण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळेच आज ईडीचे पथक घरी दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. या चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना संजय राऊत काही कागदपत्र समाधानकारक देवू न शकल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.

काय आहे प्रकरण?

पत्राचाळ येथील जागा म्हाडाने विकसनासाठी दिली होती. त्याबदल्यात वाधवान बिल्डर्सला एफएसआय देण्यात आला होता. पण वाधवान बिल्डर्सने एफएसआय इतरांना विकला. त्याबदल्यात पैसे घेतले. तसेच विकसनाच्या नावाखाली बँकेकडून हजारो कोटींचे कर्ज घेतले. त्यातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला.

याप्रकरणी म्हाडासह इतर बिल्डरांचेही नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याची चौकशी सुरू झाली. प्रविण राऊत यांना त्यानंतर अटक करण्यात आली. राऊतांच्या माध्यमातून संजय राऊतांच्या पत्नीला पन्नास लाख रुपये दिल्याचे चौकशीत समोर आले होते. या प्रकरणात आता संजय राऊतांचाही संबंध असल्याचा ईडीला संशय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT