Sindkhed Raja Municipal Council Election
Sindkhed Raja Municipal Council Election  Sarkarnama
विदर्भ

Sindkhed Raja : खासदार जाधवांनी काढला वचपा; आघाडीला धक्का देत सत्ता आणली खेचून

सरकारनामा ब्यूरो

बुलढाणा : शिंदे गटाचे नेते खासदार प्रतापराव जाधव यांनी महाविकास आघाडीचा बदला घेतला आहे. कारण आधी महाविकास आघाडीचे सरकार असताना सिंदखेड राजामध्ये शिवेसना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी करत भाजपला सत्तेपासून दूर केले होते. आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर तो वचपा जाधव यांनी काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सिंदखेड राजा नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत अत्यंत चुरस पाहायला मिळाली. या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत उपाध्यक्ष पदी शिंदे गट व भाजपचे उमेदवार भीमा जाधव यांची निवड झाली आहे. नगराध्यक्षा तथा पिठासीन अधिकारी सतीश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली. (Sindkhed Raja Municipal Council Election)

शिंदे गट व महाविकास आघाडीच्या उमेदवाराला एकसमान ९-९ मतदान पडल्यामुळे अखेर नगराध्यक्ष सतीश तायडे यांना असलेल्या कास्टींग मतदानावरच युतीच्या उमेदवारांचा विजय झाला. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा रुख्मिणाबाई राधाजी तायडे यांनी राजीनामा दिल्यामुळे उपाध्यक्ष पद रिक्त झाले होते.

राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा रुख्मिणाबाई राधाजी तायडे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी पक्षाचा सदस्य उपाध्यक्ष होईल, अशी परिस्थिती होती. मात्र शिवसेना नगरसेवक भीमा पंडित जाधव यांचा राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र जसजशी निवडणूक जवळ येत होती तशी जाधव यांनी राष्ट्रवादीकडून असल्याची आपली भूमिका बदलली. २५ डिसेंबरला शिवसेनेकडून उपाध्यक्ष पदासाठी थेट भीमा जाधव यांचेच नाव जाहीर झाल्याने राष्ट्रवादीत संतापाची लाट उसळी.

२७ डिसेंबरला झालेल्या नगर परिषद उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेख अजीम गफार तर शिंदे गटाकडून भीमा पंडित जाधव यांनी अर्ज दाखल केले होते. नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी सतिश तायडे यांनी मतदान घेवून महाविकास आघाडीचे उमेदवार शेख अजीम व शिंदे गटाचे उमेदवार भीमा जाधव यांना सारखेच ९-९ समसमान मतदान पडले.

त्यामुळे नगराध्यक्ष सतीश तायडे यांनी कास्टिंग मतदान करून शिंदे गटाचे उमेदवार भीमा जाधव यांच्या पारड्यात टाकल्याने शिंदे गटाचे उमेदवार भीमा पंडित जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. यावेळी नगराध्यक्ष, नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, सभापती उपस्थित होते.

''राज्यात विधानसभा निवडणुकी पूर्वी येथे पालिकेची निवडणूक झाली होती. दरम्यान शिवसेनेने महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्याने पालिकेत देखील महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली. यावेळी रुख्मिणाबाई राधाजी तायडे यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली. एक वर्षाच्या काळानंत तायडे यांचा राजीनामा घेण्याचे ठरले होते''.

''मात्र काही अडचणीमुळे याला उशीत झाला असला तरी रुख्मिणाबाई तायडे यांनी रीतसर राजीनामा दिल्याने ही निवडणूक लागली. शहराच्या विकासासाठी पालिकेतील ही महाविकास आघाडी कायम राहील, असा निर्णय झाला होता.''

''मात्र शिवसेनेने उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत स्वतःचाच उमेदवार दिला. दरम्यान आजची निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर असून याला आम्ही जिल्हाधिकारी व तत्सम यंत्रणांकडे आवाहन देणार आहोत'', असं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT