Rashmi Shukla Gadchiroli Sarkarnama
विदर्भ

Gadchiroli Naxal : एकाच महिन्यात महासंचालक रश्मी शुक्ला पुन्हा गडचिरोलीत

IPS Rashmi Shukla : लोकसभा निवडणुकीपूर्वी कृषी मेळाव्याच्या माध्यमातून साधला महिलांशी संवाद. लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन

प्रसन्न जकाते

Gadchiroli Naxal : हत्या आणि हिंसक घटनांमधून लोकसभा निवडणुकीपूर्वी गडचिरोलीत दहशत पसरविण्याच्या माओवाद्यांच्या मनसुब्यांना महाराष्ट्र पोलिस दलाने आता चांगलाच सुरूंग लावला आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सिमावर्ती अतिदुर्गम भागात रातोरात पोलिस ठाणे आणि पोलिस आऊटपोस्ट उभारण्याचा सपाटा सध्या गडचिरोली पोलिस दलाने लावला आहे. यासोबतच मेडीगड्डा, सूरजागड लोहखनीज प्रकल्पाच्या भागातही सुरक्षा दलांनी आपली लगाम कसली आहे. त्यामुळे एकापाठोपाठ राजकीय नेते व वरिष्ठ पोलिस अधिकारी लोकसभा निवडणुकीपूर्वी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

मुख्यमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत गेल्या दीड महिन्यात अनेक वरिष्ठ पोलिस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गडचिरोलीचे दौरासत्र सुरू केले. गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अलीकडच्या काळात सातत्याने जिल्ह्यातील महत्त्वाच्या विषयांकडे जातीने लक्ष घालत आहेत. जसजसा लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ जवळ येत आहे तसतसे प्रशासन माओवाद्यांची नांगी ठेचण्यासाठी व आदिवासी मतदारांना जागृत करण्यासाठी वेगवेगळे उपाय करताना दिसत आहेत. त्यामुळेच गेल्या एक महिन्या राज्याच्या पोलिस महासंचालकांनी तीनदा गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवृत्त होण्यापूर्वी तत्कालीन पोलिस महासंचालक रजनीश सेठ हे गडचिरोलीत येऊन गेले. त्यावेळी त्यांनी आदिवासींशी संवाद साधला. आता महाराष्ट्राच्या विद्यमान पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या दुसऱ्यांदा गडचिरोलीच्या दौऱ्यावर आल्या आहेत. आपल्या पहिल्या दौऱ्यातही शुक्ला यांनी अत्यंत दुर्गम भागातील पोलिस ठाण्यांची पाहणी केली होती. यावेळीही त्यांनी माओवादी कारवायांच्या दृष्टीने सतत ‘रेडअलर्ट’वर राहणाऱ्या मन्नेराजाराम आणि भामरागड पोलिस ठाण्याला भेट दिली. लोकसभा निवडणुकीसाठी शुक्ला यांनी मन्नेराजाराम पोलिसांची ‘स्टॅण्ड टू ड्रिल’ घेतली. राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीश जैन, नक्षल विरोधी अभियानाचे महानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोलीचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल आदी यावेळी उपस्थित होते.

गडचिरोली पोलिसांनी यावेळी कृषी मेळाव्याचे आयोजन केले. मेळाव्यात आदिवासी महिलांना महासंचालक आयपीएस रश्मी शुक्ला यांनी संबोधित केले. लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी वेळी केले. गडचिरोली पोलिस राबवित असलेल्या ‘दादालोरा खिडकी’ची माहितीही त्यांनी उपस्थिताना दिली. माओवाद्यांच्या खोट्या चळवळीला बळी न पडता सरकारी यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकारकडून गडचिरोलीच्या विकासासाठी राबिवण्यात येत असलेल्या योजनांचा पाढा रश्मी शुक्ला यांनी वाचला. कोणत्याही कुटुंबाला सावरण्याची, समजाविण्याची व कुटुंबातील सदस्यांना योग्य मार्ग दाखविण्याची शक्ती ही महिलांमध्ये असते. आदिवासी भागातील प्रत्येक महिलेने माता, भगिनी, पत्नी अशी भूमिका पार पाडताना आपल्या संपूर्ण परिवाराला, गावाला योग्य दिशेकडे न्यावा असा जोशीही महासंचालक रश्मी शुक्ला यांनी यावेळी भरला.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT