Gondia Birsi Airport Issue. Sarkarnama
विदर्भ

Gondia : बिरसी विमानतळाचा तिढा सुटता सुटेना, आता परसवाडाचे गावकरी म्हणतात...

अभिजीत घोरमारे

Paraswada Villagers Protest : गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळ विस्तारीकरण मुद्दा प्रशासनाची डोकेदुखी बनला आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी बिरसी विमानतळ प्राधिकरणाने परसवाडा-कामठा मार्ग बंद केला गेला. त्यावरून परसवाडा येथील ग्रामस्थांनी आता धरणे आंदोलन सुरू केले आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणाला विरोध नाही; पण परसवाडा-कामठा मार्ग बंद करण्यापूर्वी गावकऱ्यांना पर्यायी रस्ता तयार करून देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मुद्द्यावर गावकरी भूमिकेवर ठाम आहेत.

जिल्हा प्रशासन व बिरसी विमानतळ प्राधिकरणाने शनिवारी (ता. 7) चोख पोलिस बंदोबस्तात परसवाडा-कामठा मार्ग बंद केला. याची कोणतीही पूर्वसूचना गावकऱ्यांना न देता हा रस्ता बंद केल्याने रोष व्यक्त होत आहे. बिरसी विमानतळाच्या विस्तारासाठी विरोध नाही; पण पर्यायी व्यवस्था न झाल्यास आरोग्य, शिक्षण, बँक, शेतीसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी प्रवास कोणत्या मार्गाने करायचा, असा प्रश्न गावकऱ्यांनी केला आहे.

या विषयाला घेऊन गावकऱ्यांनी आता न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. 5 जानेवारीला उपविभागीय अधिकारी व बिरसी विमानतळाचे संचालकांनी परसवाडा ग्रामपंचायत कार्यालय येथे भेट दिली. तेव्हाही गावकऱ्यांना परसवाडा-कामठा मार्ग बंद करण्यात येणार असल्याची कुठलीही पूर्वसूचना दिली नव्हती. ही बाब लक्षात घेत या आंदोलनात गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी मध्यस्थी सुरू केली आहे. आमदार अग्रवाल यांनी भेट देत आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांची अडचण जाणून घेतल्या. परसवाडा-कामठा मार्ग बंद करण्यापूर्वी नागरिकांना पर्यायी रस्ता तयार करून देण्याची मागणी योग्य आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली.

बिरसी विमानतळ प्राधिकरण व प्रशासनाने गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजे, त्यांचे समाधान केले पाहिजे. नागरिकांना विश्वासात घेऊन काम केल्यास ते कार्य शीघ्रतेने पूर्ण होईल. त्यामुळे नागरिकांसोबत बैठक घेऊन चर्चा करावी व समस्येतून मार्ग काढण्याबाबत सूचना आमदार विनोद अग्रवाल यांनी विमानतळ प्रशासनाला केल्या. तहसीलदारांनादेखील यात लक्ष देऊन नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष देण्यास आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बिरसी विमानतळ विस्तारीकरणाचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून बिकट बनत चालला आहे. अधिग्रहित जमीन प्रकरणाचा अलिकडेच तोडगा निघाला आहे. अशात आता परसवाडा-कामठा मार्ग बंद करण्यात आल्याने पुन्हा रस्त्याच्या मुद्द्यावरून बिरसी विमानतळ प्रशासनाला धारेवर धरले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल व खासदार सुनील मेंढे यांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सर्व अडचणींवर तोडगा काढण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

Edited by : Prasannaa Jakate

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT