Basavaraj Bommai, Devendra Fadnavis sarkarnama
विदर्भ

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक करणं अयोग्य; फडणवीसांनी कर्नाटक सरकारला ठणकावलं!

Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात जाऊ दिलं पाहिजे....

सरकारनामा ब्यूरो

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगावात आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. तसेच त्याठिकाणी जमावबंदीचे आदेश देत महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात येण्यास मनाई केली असून एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड देखील पोलिसांकडून सुरु आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक करणं अयोग्य आहे अशा शब्दांत कर्नाटक सरकारला ठणकावलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या विधीमंडळ सभागृहात कर्नाटक सरकारकडून बेळगावात एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर सुरु असलेल्या कारवाईवर भाष्य केलं. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात जाऊ दिलं पाहिजे. सीमावर्ती गावातील प्रश्न मार्गी लावणार आहोत. सीमावर्ती भागातील गावांच्या विकासासाठी विशेष योजना देखील आणणार आहोत. तसेच बेळगावातील मराठी बांधवांच्या पाठीशी उभं राहणं हे सरकारचं काम अशी ठाम भूमिका देखील फडणवीस यांनी विधीमंडळाच्या सभागृहात मांडली.

महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज महामेळावा होणार होता. या मेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेशही देण्यात आला आहे. या महामेळाव्यासाठी तयार करण्यात आलेलं व्यासपीठ पोलिसांनी हटवलं आहे. या स्टेजवरचं साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्याला महामेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी महाविकास आघाडीचे व एकीकरण समितीचे नेते माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली बेळगावच्या दिशेनं निघाले आहेत. मात्र, कोगनोळी टोलनाक्यावर एकीकरण समितीचे नेते दाखल झाल्यावर त्यांना पोलिसांनी रोखले.

यावेळी पोलीस आणि महाविकास आघाडीच्या सरकार व एकीकरण समितीच्या नेतेमंडळींना रोखण्यात आले. तसेच कर्नाटक पोलिसांनी बेळगावच्या माजी महापौरांना अटक केली आहे. तसेच एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड देखील पोलिसांनी सुरु केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT