Jagannath Dhone Death Case Sarkarnama
विदर्भ

Jagannath Dhone News : माजी आमदार ढोणेंचा संशयास्पद मृत्यू?; पत्नीचे दोन माजी आमदारांसह एका आमदारावर गंभीर आरोप

Jagannath Dhone Suspicious Death Case : माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा पत्नीचा आरोप...

जयेश विनायकराव गावंडे

माजी आमदार डाॅ. जगन्नाथ ढोणे यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून, त्यांच्या मृत्यूस परभणीच्या एका विद्यमान आमदारासह अकोला जिल्ह्यातील दोन माजी आमदारांसह राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली. पातूर येथील प्रियदर्शनी आदिवासी उत्कर्ष फाउंडेशन नवेगावद्वारा संचालित डाॅ. आशालता जगन्नाथ ढोणे बीएएमएस महाविद्यालय पातूर हडपण्याचा डाव असल्याचा आरोपही श्रीमती ढोणे यांनी केला आहे. अकोल्यातील हाॅटेल सेंट्रल प्लाझामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उपरोक्त गंभीर आरोप केले.

पतीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी सीबीआयमार्फत चौकशी व्हावी. डॉ. जगन्नाथ ढोणे यांचा 27 ऑक्टोबर 2020 रोजी गीतानगर येथील राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला होता. डॉ. ढोणे हे आपल्या वैद्यकीय महाविद्यालय संस्थेच्या संदर्भात मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात गेले होते. मात्र, तेथून परतल्यानंतर ते भयंकर तणावात दिसून आले. वारंवार फोनवरून ते कुणाला काहीतरी रागात सांगत होते.

मी काही ट्रान्सफर केले नाही. मी काही सह्या केल्या नाहीत, माझ्यासोबत घात झाला असल्याचा उल्लेख त्यांच्या बोलण्यातून जाणवला. मी त्यांना धीर देत विचारपूस केली. आपल्यासोबत मोठा दगाफटका झाल्याचे त्यांनी सांगितले होते. दुसऱ्या दिवशी ते कुठेतरी गेले. त्यानंतर संध्याकाळी चार तासांनी घरी आल्यावर पुन्हा तणावात दिसले. त्यांना सारख्या उलट्या होत होत्या. ते तसेच झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना उठवले असता ते मृतावस्थेत आढळून आल्याचे त्या म्हणाल्या.

त्यांना तातडीने आयकॉन येथे नेण्यात आले. हृदयविकाराच्या झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांचे पोस्टमाॅर्टेम करण्यात आले नाही. हा चटकन झालेला सर्व प्रकार संशयास्पद आहे. म्हणून अशा घटनेची चौकशी सीबीआयमार्फत करावी. यातील सत्य उजेडात आणावे, अशी मागणी त्यांनी केली. या पत्रकार परिषदेला महेंद्र ढोणे, बोचरे, राखोंडे, प्रतिभा बोचरे आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परभणीच्या आमदारावर केले आरोप

डॉ. ढोणे यांच्या पातूरच्या संस्थेचे बीएएमएस महाविद्यालय बळकावण्याचा प्रयत्न आमदार राहुल पाटील करीत आहेत. अकोल्यातील माजी आमदारांना हाताशी धरून आमदार पाटील यांनी पतीचा प्रिप्लॅन मर्डर केल्याचा आरोप श्रीमती ढोणेंनी केला.

माजी आमदार दाळू गुरुजी, बिडकरसुद्धा जबाबदार असल्याचा आरोप

डाॅ. ढोणे यांच्या मृत्यूस अकोल्याचे माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, तुकाराम बिडकर व राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे पदाधिकारी दिलीप आसरे हेसुद्धा जबाबदार आहेत. आमदार राहुल पाटीलला बीएएमएस काॅलेज हडप करून देण्यासाठी या तिघांनीही सहकार्य केल्याचा आरोप श्रीमती ढोणेंनी केला.

आरोप धादांत खोटे असल्याचे प्रत्युत्तर

डाॅ. ढोणे हे आमचे चांगले मित्र होते. त्यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध होते. त्यामुळे नेहमी त्यांच्या घरी येणे-जाणे राहायचे. त्यांच्या मृत्यूशी आमचा दूरदूरही संबंध नाही. महिलेने केलेले आरोप तथ्यहीन असल्याचे माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी म्हटले आहे.

आम्ही तिघेही वेगवेगळ्या पक्षात असल्यानंतरही आमची मैत्री घट्ट होती. ती संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांच्या मृत्यूशी माझा काहीही संबंध नाही. महिलेचे आरोप खोटे असल्याचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांनी म्हटलं आहे.

डाॅ. प्रा. आशालता ढोणे यांना माझी बहीण मानायचो. त्यांच्या लग्नात मी मोठा भाऊ म्हणून डाॅ. जगन्नाथ ढोणे यांचे पाय धुतले. या नात्याने ते माझे जावई लागायचे. शिवाय आमची मैत्री होती. त्यांच्या मृत्यूस मी कारणीभूत नसल्याचं राष्ट्रवादीचे पदाधिकारी दिलीप आसरे यांनी म्हटलं आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT