Nagpur News : भाजप ते भारत राष्ट्रनिर्माण पक्ष असा प्रवास करणारे माजी आमदार चरण वाघमारे यांची आता शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भंडारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. वाघमारे यांना राष्ट्रवादीत प्रवेश आणि उमेदवारी देण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोठा विरोध केला होता. आता त्यांच्याच नेतृत्वात येथील पदाधिकाऱ्यांना काम करावे लागणार आहे.
चरण वाघमारे भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर २०१४च्या निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र भाजप नेत्यांसोबत त्यांचे बिनसले. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करून वेगळा मार्ग निवडला होता. त्यांना परत घेण्याच्या हालचाली भाजपात सुरू असताना त्यांनी भारत निर्माण पक्षात प्रवेश केला. विदर्भाचे समन्वयक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपण्यात आली होती. मात्र तेलंगणात भारत निर्माण पक्षाचा सफाया झाल्यानंतर पक्षाने आपला महाराष्ट्रातील विस्तार गुंडाळला.
उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर आमदार राजू कारेमोरे प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात त्यांच्यासोबत गेले. मात्र भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघावरचा दावा शरद पवार यांनी सोडला नाही. कारेमोरे यांच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी चरण वाघमारे यांच्यावर डाव लावला. मात्र स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी चरण वाघमारे यांच्या प्रवेशाला काडाडून विरोध केला होता. त्यांना उमेदवारी दिल्यास आम्ही पक्ष सोडू असाही इशारा दिला होता. मात्र खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मध्यस्थी केली. स्थानिकांची समजूत घातली आणि वाघमारे यांना प्रवेश देऊन त्यांना उमेदवार केले.
मात्र, स्थानिकांनी आपल्या विरोध कायम ठेवला. वाघामारे यांच्या विरोधात स्वतंत्र मेळावा घेतला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP) गटाचे राजू कारेमारे दुसऱ्यांदा निवडून आले. विधानसभेच्या निवडणुकीतनंतर भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्य सुस्तावले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चरण वाघमारे यांना जिल्हाध्यक्ष करून त्यांना कामाला लावले आहे. आता स्थानिक पदाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.